मुंबई Ganeshotsav 2024 : मुंबईकरांचा लाडका बाप्पा आगमनासाठी सज्ज झाला आहे. बाप्पाच्या आगमनाला आता अवघे काही दिवस उरले आहेत. अशातच प्रतिष्ठित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणपती मूर्ती शाळेतून मंडळाच्या मंडपापर्यंत नेण्यास आतापासूनच सुरुवात झाली आहे. या गणेशोत्सव मंडळाच्या आगमन मिरवणुका मुंबईत प्रसिद्ध आहेत. ढोल, ताशा, पारंपरिक नृत्य, लेझीम असे वाजत गाजत मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे आगमन सोहळे पाहायला मिळतात. मात्र, या आगमन सोहळ्यांना होणारी गर्दी पाहता, आता मुंबई महानगरपालिकेनं गणेशोत्सव मंडळांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
मिरवणूक मार्गावर 13 धोकादायक पूल :मुंबईतील बहुतांश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे गणपती हे अनेकदा परेल, लालबाग या भागातून मुंबईतल्या कानाकोपऱ्यात जातात. मात्र, याच भागात अनेक ब्रिटिशकालीन जुने पूल आहेत. हे पूल आता जीर्ण झाल्यानं धोकादायक बनले आहेत. या फुलांवरुन मिरवणूक नेताना गणेशोत्सव मंडळांनी काळजी घ्यावी, असं आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनानं केलं आहे. पालिकेच्या माहितीनुसार, मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या मार्गावर असे एकूण 13 धोकादायक पूल असून, या फुलांवरून गणपती मिरवणुका नेताना काळजी घ्यावी लागणार आहे.
गणेशोत्सव मंडळांनी सूचनांचं करावं काटेकोरपणे पालन : याबाबत पालिकेने दिलेली अधिक माहिती अशी की, महानगरपालिका कार्यक्षेत्रात मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील 13 पूल धोकादायक स्वरुपाचे आहेत. यातील काही पुलांच्या दुरुस्तीची कामं सुरू आहेत. तर, काही पुलांची कामं पावसाळ्यानंतर सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे गणेशभक्तांनी आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान या पुलांवरून जाताना काळजी घेण्याचं आवाहन पालिकेनं केलं आहे. याबाबत महानगरपालिका आणि मुंबई पोलीस यांच्या वतीनं वेळोवेळी सूचना देखील करण्यात येणार असल्याचं पालिकेनं म्हटलं आहे. त्यामुळे या सूचना व निर्देशांचे गणेशोत्सव मंडळांनी काटेकोरपणे पालन करावं असं आवाहन महानगरपालिका प्रशासनानं केलं आहे.
मिरवणुका नेताना काय घ्यावी काळजी : या 13 पूलांवरुन मिरवणुका नेताना काय काळजी घ्यावी याच्या सूचना देखील पालिकेकडून करण्यात आल्या आहेत. या सूचनांमध्ये, पुलांवर एकावेळेस अधिक वजन होणार नाही, याची काळजी घ्यावी. या पुलांवर डीजे आणि मोठमोठे स्पीकर लावून नाचगाणी करण्यात येऊ नये. उत्सवाचा आनंद पुलावरुन खाली आल्यावर घ्यावा. पुलावर एका वेळेस भाविकांची जास्त गर्दी न करता, पुलावर जास्त वेळ न थांबता त्वरित पुलावरुन पुढं जावे, पोलीस आणि बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनानं दिलेल्या सूचनेनुसार मार्गक्रमण करावं, अशा मार्गदर्शक सूचना पालिकेनं जारी केल्या आहेत.
हे पूल आहेत धोकादायक : पालिकेनं या 13 धोकादायक पूलांची यादी देखील दिली असून, या 13 फुलांमध्ये, मध्य रेल्वेवरील घाटकोपर रेल्वे ओव्हर ब्रिज, करी रोड रेल्वे ओव्हर ब्रिज, आर्थर रोड रेल्वे ओव्हर ब्रिज किंवा चिंचपोकळी रेल्वे ओव्हर ब्रिज, भायखळा रेल्वे ओव्हर ब्रिज, शीव (सायन) स्टेशन रेल्वे ओव्हर ब्रिजवरून मिरवणूक नेताना काळजी घ्यावी. तसेच पश्चिम रेल्वे मार्गावरील मरीन लाईन्स रेल्वे ओव्हर ब्रिज, सँडहर्स्ट रोड रेल्वे ओव्हर ब्रिज (ग्रॅन्ट रोड व चर्नी रोडच्या मध्ये), फ्रेंच रेल्वे ओव्हर ब्रिज (ग्रॅन्ट रोड व चर्नी रोडच्या मध्ये), केनडी रेल्वे ओव्हर ब्रिज (ग्रॅन्ट रोड व चर्नी रोडच्या मध्ये), फॉकलॅन्ड रेल्वे ओव्हर ब्रिज (ग्रॅन्ट रोड व मुंबई सेंट्रलच्या मध्ये), महालक्ष्मी स्टेशन रेल्वे ओव्हर ब्रिज, प्रभादेवी–कॅरोल रेल्वे ओव्हर ब्रिज आणि दादर येथील लोकमान्य टिळक रेल्वे ओव्हर ब्रिज आदींवरून मिरवणूक नेताना काळजी घ्यावी, असं आवाहन महानगरपालिका प्रशासनानं केलं आहे.
हेही वाचा :
- यंदा गणेशोत्सवात 'पीओपी'च्या गणेश मूर्तींवर बंदी नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा मूर्तीकारांना दिलासा - POP Ganesh Murti Banned
- गणेशोत्सव 2024; महापालिकेची मुंबईकरांना भेट, यावर्षी करणार 204 कृत्रिम तलावांची निर्मिती - Ganeshotsav 2024
- शाडूच्या गणेश मूर्तीसाठी बडगा; पण मातीच नाही, माती आणि पीओपी मूर्तींमधील फरक कसा ओळखायचा? - Ganeshotsav 2024