नवी दिल्ली WPL 2024 DCW vs RCBW : दिल्ली कॅपिटल्सनं महिला प्रीमियर लीग 2024 च्या प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवलाय. रविवारी झालेल्या रोमहर्षक सामन्यात त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा अवघ्या 1 धावेनं पराभव केला (DCW vs RCBW). जेमिमाह रॉड्रिग्जनं शानदार फलंदाजी करत दिल्लीसाठी अर्धशतक झळकावलं. तिनं 36 चेंडूत 58 धावा केल्या. एलिस कॅप्सीनंही 48 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तसंच गोलंदाजीत कॅप्सीनंही एक विकेटही घेतली. आरसीबीकडून रिचा घोषनं अर्धशतक झळकावलं. मात्र, ती संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. आरसीबीकडून श्रेयंका पाटीलनं 4 बळी घेतले. (rcb vs dc wpl)
प्लेऑफमध्ये पोहोचणारा दुसरा संघ : दिल्ली कॅपिटल्स प्लेऑफमध्ये पोहोचणारा दुसरा संघ ठरलाय. यासह ते गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचले आहेत. मुंबई इंडियन्सनं याआधीच प्लेऑफमध्ये प्रवेश केलाय. हा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्लीनं 7 सामने खेळले असून 5 जिंकले आहेत. त्यांचे 10 गुण आहेत. नेट रन रेटच्या बाबतीत दिल्ली मुंबईच्या पुढं आहे. त्यामुळं दोन्ही संघांचे प्रत्येकी 10 गुण असूनही दिल्ली अव्वल स्थानावर आहे.
-
𝙌𝙪𝙖𝙡𝙞𝙛𝙞𝙚𝙙! 🥳
— Women's Premier League (WPL) (@wplt20) March 10, 2024
After Mumbai Indians, @DelhiCapitals become the 2nd team to qualify for the #TATAWPL 2024 Playoffs! #DCvRCB pic.twitter.com/vV0f2aJdWV
दिल्लीसाठी जेमिमाचं शानदार अर्धशतक : या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्लीनं 181 धावा केल्या. यादरम्यान जेमिमा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आली. तिनं 36 चेंडूंचा सामना करताना 8 चौकार आणि 1 षटकार मारत 58 धावा केल्या. एलिस कॅप्सी (alice capsey) चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आली. तिनं 32 चेंडूत 48 धावा केल्या. या खेळीत तिनं 8 चौकार मारले. कर्णधार मेग लॅनिंगनंही 5 चौकारांच्या मदतीनं 29 धावा केल्या. शफाली वर्मानं 23 धावांचं योगदान दिलं.
रोमहर्षक सामन्यात आरसीबीचा 1 धावेनं पराभव : दिल्लीनं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना बंगळुरू अवघ्या 1 धावेनं मागे राहिला. त्यांनी 7 गडी गमावून 180 धावा केल्या. बंगळुरुसाठी ऋचा घोषनं अर्धशतक झळकावलं. मात्र तिला विजय मिळवून देता आला नाही. 29 चेंडूंचा सामना करताना तिनं 4 चौकार आणि 3 षटकार मारले. एलिस पेरीनंही 32 चेंडूत 49 धावा केल्या. तिनं 7 चौकार आणि 1 षटकार मारला. सोफियानं 33 धावांचे योगदान दिले.
शेवटचे षटक रोमहर्षक : या सामन्यातील शेवटचे षटक श्वास रोखून धरणारे होते. शेवटच्या षटकात आरसीबीला विजयासाठी 17 धावांची गरज होती. ऋचा स्ट्राइकवर होती. यावेळी दिल्लीकडून जोनासन गोलंदाजी करत होती. ऋचानं पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. दुसरा चेंडू निर्धाव होता. तिसऱ्या चेंडूवर दिल्लीला विकेट मिळाली. आरसीबीसाठी नॉन स्ट्राइकवर असलेली दिशा (disha kasat) धावबाद झाली. यानंतर ऋचानं चौथ्या चेंडूवर 2 धावा आणि पाचव्या चेंडूवर षटकार ठोकला. मात्र शेवटच्या चेंडूवर दोन धावांची गरज असताना ती धावबाद झाल्यानं दिल्लीनं सामना जिंकला.
हेही वाचा :