हैदराबाद ODI Cricket World Cup 1975 : वेस्ट इंडिज क्रिकेट संघाची कामगिरी अलीकडच्या काळात काही विशेष राहिलेली नाही. विशेषत: कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये या संघाला खूप संघर्ष करावा लागतोय. गेल्या वर्षी भारतात झालेल्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकासाठी वेस्ट इंडिजलाही पात्रताही मिळवता आली नव्हती, ही त्यांच्यासाठी लाजीरवाणी बाब होती. मात्र एक काळ असा होता जेव्हा वेस्ट इंडिज संघाचा क्रिकेट विश्वात एकहाती वरचष्मा होता आणि या खेळावर त्यांची पुर्ण सत्ता होती.
पहिल्या विश्वचषकात वेस्ट इंडिज विश्वविजेता : आजपासून 49 वर्षांपूर्वी म्हणजेच 21 जून 1975 रोजी वेस्ट इंडीजनं क्रिकेटच्या मक्का समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्सवर इतिहास रचला होता. तेव्हा क्लाइव्ह लॉईडच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजनं क्रिकेट विश्वचषकाच्या पहिल्या आवृत्तीचं विजेतेपद पटकावलं होतं. अंतिम फेरीत वेस्ट इंडिजनं अपेक्षेप्रमाणे खेळ करत ऑस्ट्रेलियाचा 17 धावांनी पराभव करुन विजेतेपद पटकावलं होतं. त्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजनं नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना 60 षटकांत आठ गडी गमावून 291 धावा केल्या होत्या. कर्णधार क्लाईव्ह लॉईडनं 85 चेंडूत 12 चौकार आणि 2 षटकारांसह 102 धावांची खेळी खेळली. तर रोहन कन्हाईनं 55 आणि किथ बॉयसनं 34 धावांचं महत्त्वपूर्ण योगदान दिलं. तर कांगारु संघासाठी वेगवान गोलंदाज गॅरी गिलमोरनं सर्वाधिक पाच बळी घेतले होते.
कांगारुंची खराब खेळी : प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ 58.4 षटकांत 274 धावा करुन बाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार इयान चॅपेलनं 62 आणि ॲलन टर्नरनं 40 धावांचं योगदान दिलं. वेस्ट इंडिजसाठी किथ बॉयसनं फलंदाजीनंतर गोलंदाजीत चमक दाखवत 50 धावांत चार बळी घेतले. विशेष म्हणजे अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाचे पाच फलंदाज धावबाद झाले. त्यापैकी तीन धावबाद विवियन रिचर्ड्सनं केले होते.
पहिल्या विश्वचषकात भारताची निराशाजनक कामगिरी : 1975 चा क्रिकेट विश्वचषक इंग्लंडमध्ये 7 ते 21 जून दरम्यान खेळला गेला होता. विश्वचषकाच्या पहिल्या आवृत्तीत एकूण आठ संघ सहभागी झाले होते. त्यात अ गटात यजमान इंग्लंड, न्यूझीलंड, भारत आणि पूर्व आफ्रिकेचे संघ होते. दुसरीकडे वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि श्रीलंका यांना ब गटात ठेवण्यात आलं होतं. 1975 च्या विश्वचषकात भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक होती. भारतीय संघाला तीनपैकी फक्त एकच सामना जिंकता आला, त्यामुळं ते सेमीफायनलमध्येही पोहोचू शकले नव्हते. त्यावेळी एस. वेंकटराघवन भारतीय संघाचे कर्णधार होते.
भारतानं दोन वेळच्या विश्वविजेत्या वेस्ट इंडिजला पाजलं पाणी : 1975 च्या विश्वचषक स्पर्धेत अ गटातून इंग्लंड आणि न्यूझीलंडनं उपांत्य फेरी गाठली, तर ब गटातून वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियानं ही कामगिरी केली. त्यानंतर पहिला उपांत्य सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झाला, ज्यात ऑस्ट्रेलियानं चार गडी राखून विजय मिळवला. यानंतर दुसऱ्या उपांत्य फेरीत वेस्ट इंडिज संघानं न्यूझीलंडवर पाच गडी राखून विजय मिळवला. अशा स्थितीत ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज हे दोन बलाढ्य संघ अंतिम सामन्यात आमनेसामने आले होते. 1975 नंतर 1979 च्या क्रिकेट विश्वचषकातही वेस्ट इंडिजनं दमदार कामगिरी केली आणि यजमान इंग्लंडचा पराभव करुन सलग दुसऱ्यांदा ट्रॉफीवर कब्जा केला. मात्र त्यानंतर, क्लाइव्ह लॉईडच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडिज संघ 1983 च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचण्यात यशस्वी झाला, त्यात भारतीय संघानं त्यांचा पराभव केला होता.
हेही वाचा :