आगरतळा (त्रिपुरा) Mayank Agarwal : टीम इंडियाचा स्टार सलामीवीर आणि कर्नाटकचा कर्णधार मयंक अग्रवालबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. मयंक आगरतळाहून रणजी सामना खेळून परतत असताना विमानतळावर विमानात चढताच त्याची प्रकृती अचानक बिघडली. त्याला तोंड आणि घशाचा त्रास होऊ लागला. यानंतर मयंकला तातडीनं आगरतळा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मयंकला कोणत्याही प्रकारचा धोका नसून सध्या त्याची प्रकृती उत्तम असल्याचं अहवालात सांगण्यात आलंय.
घशात त्रास होऊ लागला : मयंकला आगरतळा येथून मंगळवारी दुपारी अडीच वाजताची फ्लाइट पकडायची होती. तो फ्लाइटमध्ये चढलाही होता. पण यादरम्यान त्याच्या घशात काहीतरी त्रास होऊ लागला. यानंतर मयंकला तातडीनं आगरतळा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलीसही या घटनेचा तपास करत आहेत. मात्र मयंकसोबत असं कसं घडलं? याबाबत अद्याप निश्चित कळू शकलेलं नाही.
2 फेब्रुवारीला पुढील सामना : मयंक अग्रवाल 26 ते 29 जानेवारी दरम्यान आगरतळा येथे त्रिपुरा विरुद्ध सामना खेळला होता. ज्यामध्ये त्यानं 51 आणि 17 धावांची खेळी खेळली. कर्नाटकनं हा सामना 29 धावांनी जिंकला. मयंक अग्रवालच्या नेतृत्वाखालील कर्नाटकला आता रणजी ट्रॉफीमध्ये आपला पुढचा सामना 2 फेब्रुवारीला खेळायचा आहे. रेल्वे विरुद्धचा हा सामना सुरत येथे होईल. अशा परिस्थितीत मयंक या सामन्यात खेळू शकेल की नाही? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
टीम इंडियात पुनरागमनाच्या प्रतिक्षेत : मयंक सध्या भारतीय संघाबाहेर आहे. त्यानं 5 फेब्रुवारी 2020 रोजी न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. आत्तापर्यंत त्यानं भारतीय संघासाठी 21 कसोटी आणि 5 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यादरम्यान मयंकनं कसोटीत 4 शतकांच्या मदतीनं 1488 धावा केल्या, तर एकदिवसीय सामन्यात 86 धावा केल्या आहेत.
हे वाचलंत का :