जॉर्जटाउन Rohit Sharma Records : टी20 विश्वचषक स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना गयाना इथल्या प्रोव्हिडन्स मैदानावर खेळवण्यात आला. या सामन्यात भारतीय क्रिकेट संघानं इंग्लंडच्या संघावर दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा यानं कर्णधार म्हणून मोठा विक्रम केला आहे. पावसामुळे सामना थांबला तेव्हा रोहित शर्मा 26 चेंडूत 37 धावा काढून नाबाद होता. यावेळी त्यानं कर्णधार म्हणून 5 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. अशी कामगिरी करणारा रोहित शर्मा हा पाचवा कर्णधार ठरला आहे. कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहली याच्या नावावर आहे. मात्र टी20 विश्वचषकात विराट कोहली अपयशी ठरला असून रोहित शर्मानं त्याच्याबाबतही मोठं वक्तव्यं केलं आहे.
रोहित शर्माचा कर्णधार म्हणून मोठा विक्रम : इंग्लंड आणि भारत यांच्यात टी20 विश्वचषकात झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारतीय क्रिकेट संघानं मोठा विजय मिळवला. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा यानं 57 धावांची दणकेबाज खेळी केली. या खेळीच्या जोरावर रोहित शर्मानं अनोखे विक्रम आपल्या नावावर केले. रोहित शर्मानं कर्णधार म्हणून 5 हजार धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो 5 कर्णधार ठरला. या अगोदर विराट कोहली यानं कर्णधार म्हणून 12 हजार 883 धावा केल्या आहेत. तर यादीत महेंद्रसिंग धोनी दुसऱ्या स्थानावर आहे. त्यानं 11 हजार 207 धावा केल्या आहेत. तिसऱ्या स्थानावर मोहम्मद अझरुद्दीन आहे. मोहम्मद अझरुद्दीन यानं 8 हजार 095 धावा केल्या आहेत. तर चौथ्या स्थानावर भारतीय क्रिकेट संघात दादा म्हणून सुपरिचित असलेल्या सौरव गांगुली याच्या नावावर आहे. सौरव गांगुली यानं कर्णधार म्हणून 7 हजार 643 धावा काढल्या आहेत. आता या दिग्गज खेळाडूंच्या यादीत रोहित शर्माचं नाव समाविष्ट झालं आहे.
विराट कोहलीबाबत केलं मोठं वक्तव्य : टी20 विश्वचषकात भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार तथा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली हा सपशेल अपयशी ठरला आहे. विराट कोहलीनं या संपूर्ण टी20 विश्वचषकात केवळ दोन वेळा दुहेरी आकडा गाठला आहे. त्यातही मोठ्या संघाच्या विरोधात खेळताना विराट कोहलीनं नांगी टाकली. त्यामुळे विराट कोहलीच्या सततच्या अपयशावर रोहित शर्माला विचारण्यात आलं. यावेळी रोहित शर्मानं विराट कोहलीबाबत मोठं वक्तव्य केलं. तो म्हणाला, "विराट कोहली हा भारतीय क्रिकेट संघातील एक महत्वाचा खेळाडू आहे. मागील 15 वर्षात विराटनं अतिशय चांगली फटकेबाजी केली. कोणताही खेळाडू बॅडपॅचमधून जातो. विराट कोहली आता अपयशी ठरत आहे. मात्र होऊ शकते, त्यानं त्याची सर्वोत्तम खेळी अंतिम सामन्यासाठी राखून ठेवली असेल."
हेही वाचा :
- इंग्लंडला चितपट करत भारत फायनलमध्ये; दक्षिण आफ्रिकेसोबत होणार 'महामुकाबला' - India vs England
- उपांत्य फेरीत सातवेळा पराभूत झाल्यानंतर दक्षिण आफ्रिका अखेर 32 वर्षांनी अंतिम फेरीत; वाचा संघाचा निराशाजनक इतिहास - South Afica in T20 World Cup Final
- भारत-इंग्लंड उपांत्य फेरीचा सामना पावसात वाहून गेल्यास भारतीय संघ जाणार थेट अंतिम फेरीत, काय आहे नियम? - T20 World Cup 2024