बार्बाडोस T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कपला मोठ्या धडाक्यात सुरुवात झाली आहे. टी20 वर्ल्ड कपमधील आजचा सामना केन्सिंग्टन ओव्हल इथं नामिबिया आणि ओमन ( OMA VS NAM ) या दोन संघात खेळवण्यात आला. सामन्यात नामिबियाचा कर्णधार गेरहार्ड इरास्मसनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र नामिबियन गोलंदाजांच्या जोरदार माऱ्यापुढं ओमनचा संघ गडगडला. नामिबियन गोलंदाजांनी ओमानचा संघ 109 धावांवर गुंडाळला. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या नामिबियाच्या संघाला रोखण्यात ओमानच्या गोलंदाजांना यश आलं. शेवटच्या षटकात ओमानच्या गोलंदाजांनी केलेल्या माऱ्यामुळे हा सामना थरारक झाला. अखेर सुपर ओव्हरमध्ये नामिबियानं हा सामना जिंकला.
ओमानचा संघ गडगडला : नामिबियाचा कर्णधार गेरहार्ड इरास्मसनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. नामिबियाच्या संघानं ओमानचा संघ केवळ 109 धावांवर गुंडाळण्यात यश मिळवलं. ओमानच्या झीशान मकसूद, खालीद कैल, आयान खान या तीन फलंदाजांनाच केवळ दुहेरी धावसंख्येचा आकडा गाठता आला. त्यांच्याव्यतिरिक्त इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरले. त्यामुळे नामिबियाच्या गोलंदाजांनी ओमानच्या फलंदाजांवर हावी होत तुफान मारा केला.
ओमानच्या गोलंदाजांनी फोडला घाम : नामिबियाच्या संघानं ओमानच्या संघाला 20 षटकात 109 धावांवर गुंडाळलं. त्यानंतर नामिबिया हे लक्ष्य सहज गाठेल असं वाटत होतं. मात्र ओमानच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा केल्यानं नामिबियाचे गडी ठराविक अंतरानं बाद झाले. अखेरच्या षटकात नामिबियाला 5 धावांची गरज होती. मात्र ओमानचा गोलंदाज मेहेर खाननं जबरदस्त गोलंदाजी करत नामिबियाच्या फलंदाजांना रोखून धरलं. मेहेर खाननं पहिल्या तीन चेंडूत दोन फलंदाजांना तंबूत पाठवलं. नामिबियाला शेवटच्या चेंडूंवर दोन धावांची गरज होती. मात्र शेवटच्या चेंडूवर एक धाव घेत नामिबियाच्या फलंदाजांनी सामना टाय केला.
टी20 विश्वचषकात रंगला सुपर ओव्हरचा थरार : सामना टाय झाल्यानं नामिबिया आणि ओमान यांच्यात सुपर ओव्हर खेळवण्यात आली. यावेळी नामिबियानं आपला अनुभवी फलंदाज डेव्हिड व्हिसा आणि कर्णधार इरास्मस ही जोडी मैदानात उतरवली. दुसरीकडं ओमानचा धडाकेबाज गोलंदाज बिलाल खाननं गोलंदाजीची धुरा संभाळली. यावेळी डेव्हिड आणि व्हिसाच्या जोडीनं बिलाल खानवर भारी पडली. या दोघांनी तब्बल 21 धावा कुटल्या. मात्र 22 धावांचा पाठलाग करताना ओमानची सुरुवात खराब झाली. व्हिसानं भेदक गोलंदाजी करत पहिल्या तीन चेंडूतच नामिबियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. त्याच्या तिसऱ्या चेंडूवर नसीम खुशीच्या दांड्या गुल झाल्या. त्यानंतर पुढच्या दोन चेंडूवर एक एक धाव घेण्यात ओमानच्या फलंदाजांना यश आलं. मात्र शेवटच्या चेंडूवर अकिबनं षटकार ठोकला. तोपर्यंत विजय नामिबियाच्या खात्यात जमा झाला होता.
हेही वाचा :