फ्लोरिडा T20 World Cup 2024 India vs Canada : टी-20 विश्वचषक 2024 चा 33वा सामना आज भारत आणि कॅनडा यांच्यात होणार आहे. फ्लोरिडा येथील लॉडरहिल येथील सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क स्टेडियम टर्फ मैदानावर भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता हा सामना खेळवला जाईल. भारतीय संघ आधीच सुपर-8 साठी पात्र ठरला आहे. भारतीय संघ अ गटातील शेवटचा सामना जिंकून सलग चौथा विजय मिळवण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल. भारत-कॅनडा सामन्यात पाऊस खलनायक ठरू शकतो का? हा प्रश्न सर्वांच्याच मनात धुमाकूळ घालत आहे. कारण गेल्या आठवड्यापासून इथं पाऊस पडत आहे. अशा परिस्थितीत भारत-कॅनडा सामन्यावर पावसाचं सावट आहे.
फ्लोरिडामध्ये भारताची कामगिरी : ब्रॉवर्ड रिजनल पार्क स्टेडियमवर टीम इंडियाची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. या मैदानावर भारतानं 8 टी-20 सामने खेळले आहेत. या कालावधीत भारतानं 5 सामने जिंकले आहेत. त्याचवेळी त्यांना 2 सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलंय. तर एक सामना अनिर्णित राहिला. फ्लोरिडामध्ये खेळल्या गेलेल्या शेवटच्या 4 टी-20 सामन्यांपैकी भारतानं 3 जिंकले आहेत. मात्र, इथं झालेल्या अखेरच्या सामन्यात भारताला वेस्ट इंडिजकडून पराभव पत्करावा लागला.
भारतीय संघात बदल : टीम इंडिया आज कॅनडाविरुद्धच्या सामन्यात कुलदीप यादव किंवा युझवेंद्र चहल किंवा दोघांना संधी देऊ शकते. या स्थितीत भारत रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांना प्लेइंग-11 मधून बाहेर ठेवण्याचा विचार करू शकतो. सुपर-8 सोबतच उपांत्य फेरी आणि अंतिम सामने वेस्ट इंडिजमध्ये खेळवले जातील. जिथं फिरकीपटूंना मदत मिळण्याची अपेक्षा आहे. यामुळं त्यांना कॅरेबियनच्या खेळपट्ट्यांसाठी तयारी करण्याची संधी मिळू शकते.
भारताला हरवणं कॅनडासाठी सोपं नाही : युवा खेळाडूंनी भरलेल्या कॅनडाच्या संघासाठी जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांक असलेल्या टी-20 संघाचा पराभव करणं सोपं जाणार नाही. मात्र, कॅनडानं आयर्लंडचा 12 धावांनी पराभव करुन जगाला आपली ताकद दाखवून दिलीय. मात्र भारतासारख्या बलाढ्य संघाला पराभूत करणं त्यांच्यासाठी सोपं जाणार नाही. सलामीवीर ॲरॉन जॉन्सन उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. कॅनडाला त्याच्याकडून आणखी एका उत्कृष्ट खेळीची अपेक्षा असेल.
फ्लोरिडामध्ये 11 जून रोजी वादळ आलं होतं. तेव्हापासून सतत पाऊस पडत असून पूरसदृश परिस्थिती निर्माण झालीय. भारत आणि कॅनडा यांच्यात आज होणाऱ्या टी-20 विश्वचषकाच्या सामन्यादरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसामुळं सामना रद्द होऊ शकतो किंवा षटकंही कमी होऊ शकतात. मात्र, यामुळं टीम इंडियाला काही फरक पडणार नाही, कारण त्यांनी सुपर-8 चं तिकीट आधीच बुक केलं आहे.
खेळपट्टीचा अहवाल : ब्रॉवर्ड काउंटी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त आहे. या खेळपट्टीवर गोलंदाजांना नासाऊ न्यूयॉर्कच्या खेळपट्टीप्रमाणं अतिरिक्त उसळी आणि स्विंग पाहायला मिळणार नाही. नासाऊमध्ये झालेल्या तिन्ही सामन्यांमध्ये भारतानं कमी धावा केल्या आहेत. पण या खेळपट्टीवर मोठी धावसंख्या होऊ शकते. मात्र, पावसामुळं या खेळपट्टीवर गोलंदाजांनाही मदत मिळण्याची शक्यता आहे.
दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग-11
- भारताचा संघ रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.
- कॅनडाचा संघ: आरोन जॉन्सन, नवनीत धालीवाल, परगट सिंग, निकोलस किर्टन, श्रेयस मोव्वा (यष्टीरक्षक), रविंदरपाल सिंग, साद बिन जफर (कर्णधार), डायलन हेलिगर, कलीम सना, जुनैद सिद्दीकी, जेरेमी गॉर्डन.
पाकिस्तान टी-20 विश्वचषकातून बाहेर : अमेरिका आणि आयर्लंड यांच्यातील सामना रद्द झाल्यानंतर पाकिस्तान टी-20 विश्वचषकातून बाहेर पडलाय. पाकिस्तानला सुपर-8 मध्ये पोहोचण्यासाठी आयर्लंडनं अमेरिकेला या सामन्यात पराभूत करणं आवश्यक होतं, परंतु तसं झालं नाही. त्यामुळं बाबर आझम अँड कंपनी विश्वचषकातून बाहेर पडलीय. हा सामना रद्द झाल्यानंतर प्रथमच टी-20 विश्वचषकात खेळणाऱ्या अमेरिकेनं सुपर-8 मध्ये स्थान निश्चित केलं आहे. अमेरिकेचे चार सामन्यांनंतर दोन विजय आणि पाच गुण आहेत. तर पाकिस्तानचे तीन सामन्यांत दोन गुण आहेत.
हेही वाचा
- न्यूझीलंडचं टी-20 विश्वचषकाचं स्वप्न भंगलं; अफगाणिस्ताननं वाट अडवली, कसं ते वाचा... - T20 World Cup 2024
- टी-20 विश्वचषकात इंग्लंडचा धुमाकूळ, अवघ्या 19 चेंडूत 'खेळ संपला' - T20 World Cup 2024
- नागपूरच्या 'दिव्या देशमुख'नं पटकावलं विश्व ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद; 15 वर्षानंतर पदकाचा संपला दुष्काळ - DIVYA DESHMUKH News
- टी 20 क्रिकेट विश्वचषक विजेतेपदाचा दावेदार कोण? रोहित शर्माचे कोच दिनेश लाड म्हणाले... - Dinesh Lad Exclusive