राजकोट Sarfaraz Khan half century : भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पदार्पण करणाऱ्या सरफराज खाननं येताच आपली निवड सिद्ध केलीय. सरफराजनं आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिल्याच डावात शानदार अर्धशतक झळकावून सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. सरफराज बऱ्याच दिवसांपासून या संधीची वाट पाहत होता. त्यानं या संधीचा योग्य वापर केलाय.
पहिल्याच सामन्यात आक्रमक अर्धशतक : पहिलाच कसोटी सामना खेळणाऱ्या सर्फराज खाननं 62 धावा केल्या. त्यानं अवघ्या 48 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. या खेळीत त्यानं 9 चौकार आणि 1 षटकारही लगावला. सर्फराज भारताकडून फलंदाजीला आला तेव्हा संघ मजबूत स्थितीत होता. एकीकडं रवींद्र जडेजा जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत होता. त्याचवेळी रोहितच्या शतकी खेळीमुळं संघाची धावसंख्याही 300 च्या जवळ पोहोचली होती. अशा परिस्थितीत त्यानं संघाचा डाव पुढं नेण्याचा निर्णय घेतला. खेळपट्टावर येताच त्यानं वेगानं धावा काढण्यास सुरुवात केली.
शानदार खेळीचा रनआऊटनं शेवट : सरफराज खान जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत होता. तो आज आपलं शतकही पूर्ण करेल असं वाटत होतं. मात्र, डावाच्या 82 व्या षटकात रवींद्र जडेजा आणि सरफराज यांच्यात समन्वयाचा अभाव झाला. मार्क वुडनं केलेल्या शानदार थ्रोमुळं तो धावबाद झाला. सरफराजच्या या विकेटनंतर रोहित शर्माही चिडलेला दिसला. त्यानं रागानं आपली टोपी खाली फेकली.
अनिल कुंबळेनं दिली पर्दापणाची कॅप : सरफराजला भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि देशातील सर्वात यशस्वी गोलंदाज अनिल कुंबळे यानं पर्दापणाची कॅप दिली. यावेळी कुंबळे म्हणाला, "सरफराज, तू ज्या प्रकारे प्रगती केली आहेस त्याचा आम्हाला खरोखर अभिमान आहे. मला खात्री आहे की, तू जे काही साध्य केलंय, त्याचा तुझ्या वडिलांना आणि कुटुंबाला अभिमान वाटेल. मला माहित आहे की तू खूप मेहनत केली आहेस. ही तुझ्या दीर्घ कारकीर्दीची सुरुवात आहे. तुझ्या आधी फक्त 310 लोक खेळले आहेत. तुला शुभेच्छा.'' त्याचे वडील आणि प्रशिक्षक नौशाद खान यांना सरफराजनं कसोटी कॅप दाखविली. एवढंच नाही तर यावेळी त्याच्या पत्नीच्या डोळ्यात अश्रू आले होते. ते अश्रू सरफराजनं पुसले.
हेही वाचा :