नाशिक Sahil Parakh : आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधील पदार्पणाच्या मालिकेत झंझावाती शतक झळकावलेल्या नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा युवा खेळाडू, आक्रमक डावखुरा सलामीवीर साहिल पारख याची BCCI च्या विनू मंकड स्पर्धेसाठी 19 वर्षांखालील वयोगटातील महाराष्ट्र संघाच्या उपकर्णधारपदी निवड झाली आहे. BCCI ची 2024-25 ची 19 वर्षांखालील वयोगटासाठीची विनू मंकड स्पर्धा 4 ते 10 ऑक्टोबर दरम्यान नियोजित असून ती कटक इथं होणार आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध दमदार कामगिरी : ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाँडिचेरी इथं झालेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात 19 वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करतांना साहिल पारखनं केवळ 75 चेंडूत 14 चौकार व तब्बल 5 षटकारांसह नाबाद 109 धावा फटकावत, भारतीय संघाला केवळ 22 षटकांतच 9 गडी राखून जोरदार विजय मिळवून देत मालिका विजयाला हातभार लावला. 19 वर्षांखालील भारतीय संघात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मालिकेत साहिलनं 3 सामन्यांत सर्वाधिक एकूण 133 धावा करुन फलंदाजीत प्रथम स्थान पटकवलं. याचा नाशिककरांना अतिशय आनंद झाला. आजच पाँडिचेरी इथं भारतीय क्रिकेट संघानं हि एकदिवसीय मालिका 3-0 अशी जिंकली. साहिलसह 19 वर्षांखालील भारतीय संघात खेळणारा किरण चोरमळे हा या महाराष्ट्र संघाचा कर्णधार असेल.
आतापर्यंतची कामगिरी कशी : युवा साहिल पारखची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) तर्फे, नव्या 2024-25 हंगामासाठी महाराष्ट्र संघाच्या रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या शिबिरासाठी याआधीच निवड झाली आहे. साहिल पारख 26 एप्रिल ते 22 मे दरम्यान झालेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) तर्फे आयोजित नॅशनल क्रिकेट अकादमी (NCA) च्या राष्ट्रीय पातळीवरील शिबिरात सहभागी झाला होता. त्यापूर्वीच्या हंगामात देखील 16 वर्षांखालील वयोगटात साहिलची निवड झाली होती. माजी कसोटीपटू व्हिव्हिएस लक्ष्मण प्रमुख असलेल्या एनसीए बेंगळुरुतर्फे भारतभरातील उदयोन्मुख युवा खेळाडूंसाठी हे शिबीर झालं. साहिल पारेखचं शिबिर नाडियाद इथं पार पडलं. वेळोवेळी झालेल्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धेत केलेल्या लक्षणीय कामगिरीच्या जोरावरच 19 वर्षांखालील महाराष्ट्राच्या संघापाठोपाठ साहिलची यंदा एनसीएच्या राष्ट्रीय पातळीवरील खास शिबिरासाठी दुसऱ्यांदा निवड झाली होती.
नाशिककरांकडून अभिनंदन : साहिलच्या महत्वाच्या निवडीबद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटना व जिल्हा संघात, तसंच जिल्ह्यातील क्रिकेट रसिकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सेक्रेटरी समीर रकटे यांनी साहिलचं अभिनंदन करुन आगामी विनू मंकड स्पर्धेतील यशस्वी कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
विनू मंकड स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे साखळी सामने :
- 4 ऑक्टोबर - कर्नाटक
- 6 ऑक्टोबर - आसाम
- 8 ऑक्टोबर - बरोदा
- 10 ऑक्टोबर - बंगाल
- 12 ऑक्टोबर - मेघालय
हेही वाचा :