जयपूर IPL 2024 RR vs GT : शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सनं (GT) इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 मध्ये धमाकेदार कामगिरी केलीय. बुधवारी जयपूर येथील सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या सामन्यात गुजरातनं राजस्थान रॉयल्सचा (RR) 3 गडी राखून पराभव केला. राजस्थानचा या हंगामातील हा पहिलाच पराभव आहे. संजूच्या नेतृत्वाखालील राजस्थान संघानं या हंगामाच्या सुरुवातीचे चारही सामने जिंकले होते. मात्र पाचव्या सामन्यात त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. दुसरीकडं शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात संघाचा 6 सामन्यांमधील हा तिसरा विजय आहे.
चांगल्या सुरुवातीनंतर गुजरातचा डाव अडखळला : या सामन्यात 197 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या गुजरात संघाची सुरुवात चांगली झाली. शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी 64 धावांची सलामी दिली. कर्णधार गिल 44 चेंडूत 72 धावा करुन बाद झाला. तर सुदर्शन 29 चेंडूत 35 धावा करुन बाद झाला. पण गुजरातचा संघ मधल्या फळीत अडखळला. राजस्थानकडून वेगवान गोलंदाज कुलदीप सेननं 3 आणि युझवेंद्र चहलनं 2 बळी घेत गुजरातला बॅकफूटवर ढकलले.
राहुल तेवटिया रशीद खाननं हिसकावला विजय : शेवटी गुजरातला 12 चेंडूत 35 धावा हव्या होत्या. त्यानंतर राहुल तेवतिया आणि रशीद खान यांनी धडाकेबाज फलंदाजी करत राजस्थानच्या जबड्यातून विजय हिसकावून घेतला. राहुलनं 11 चेंडूत 22 धावा तर रशीदनं 11 चेंडूत नाबाद 24 धावा करत संघाला विजयापर्यंत नेलं. गुजरातनं 7 गड्यांच्या मोबदल्यात 199 धावा केल्या.
रियान परागनं संजू सॅमसनची शतकी भागिदारी : तत्पूर्वी या सामन्यात राजस्थान संघाची सुरुवात खराब झाली होती. त्यांनी 42 धावांत 2 विकेट गमावल्या होत्या. यानंतर रियान परागनं 48 चेंडूत 76 धावांची तुफानी खेळी केली. तर कर्णधार संजू सॅमसननंही स्फोटक शैलीत 38 चेंडूत 68 धावा केल्या. संजू आणि पराग यांनी तिसऱ्या विकेटसाठी 78 चेंडूत 130 धावांची भागीदारी केली आणि संघाला 3 विकेट्सवर 196 धावांपर्यंत नेलं. दुसरीकडे गुजरातसाठी एकही गोलंदाज यशस्वी होऊ शकला नाही. केवळ मोहित शर्मा, उमेश यादव आणि राशिद खान यांना प्रत्येकी 1 बळी घेता आला.
एकाच सामन्यात 3 अर्धशतकं : राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील या सामन्यात एक नव्हे, दोन नव्हे तर तीन अर्धशतकं झळकावली आहेत. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानकडून रियान परागनं 48 चेंडूंत 3 चौकार आणि 5 षटकारांसह 76 धावा केल्या. तर आरआरचा कर्णधार संजू सॅमसननंही 38 चेंडूत 68 धावा केल्या, त्यादरम्यान त्यानं 7 चौकार आणि 2 षटकारही ठोकले. गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलनं सामन्यातील तिसरं अर्धशतक झळकावलं. गिलनंही 44 चेंडूत 72 धावांच्या खेळीत 6 चौकार आणि 2 षटकार ठोकले.
हेही वाचा :