मुंबई BCCI Anti Corruption Unit : भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) मोठा निर्णय घेतला आहे. BCCI नं लाचलुचपत प्रतिबंधक युनिट (ACU) च्या नवीन प्रमुखाची निवड केली आहे. भारतीय क्रिकेटमधील ही महत्त्वाची जबाबदारी आता सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी सांभाळणार असून, ते चार वर्षे दहशतवादविरोधी संघटनेचे (NIA) प्रमुखही होते. BCCI नं निवृत्त IPS अधिकारी शरद कुमार यांची लाचलुचपत प्रतिबंधक युनिट (ACU) चे नवीन प्रमुख म्हणून निवड केली आहे.
शरद कुमार यांच्यावर मोठी जबाबदारी : उत्तर प्रदेशातील बरेली इथं राहणाऱ्या शरद कुमार यांना तीन वर्षांसाठी BCCI च्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचं प्रमुख बनवण्यात आले आहे. 29 सप्टेंबर रोजी BCCI च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यांच्या नावाला मंजुरी देण्यात आल्याचं बोर्डाच्या सूत्रांनी सांगितलं. नवीन पद स्वीकारल्यानंतर, क्रिकेटमधील भ्रष्टाचाराशी संबंधित समस्या सोडवण्यात ते महत्त्वाची भूमिका बजावतील ज्यात मॅच फिक्सिंग आणि सट्टेबाजी आदी प्रकरणांचा समावेश होतो.
कोण आहेत शरद कुमार? : शरद कुमार हे हरियाणा केडरचे 1979 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत आणि ते 2013 ते 2017 या काळात दहशतवादविरोधी संघटनेचे प्रमुख होते. NIA मध्ये राहिल्यानंतर, कुमार यांची केंद्रीय दक्षता आयोगामध्ये दक्षता आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. जिथं ते जून 2018 ते एप्रिल 2020 पर्यंत राहिले. NIA चे महासंचालक म्हणून काम करताना कुमार यांनी अनेक प्रमुख तपास आणि ऑपरेशन्समध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या कार्यकाळात NIA नं प्रतिबंधित जैश-ए-मोहम्मदच्या पठाणकोट एअरबेसवरील दहशतवादी हल्ल्यासह भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांचा तपास केला. NIA ची क्षमता आणि पायाभूत सुविधा वाढवण्यात कुमार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
शरद कुमार हरियाणा केडरचे माजी आयपीएस अधिकारी केके मिश्रा यांची जागा घेतील. केके मिश्रा यांना गेल्या वर्षी BCCI च्या भ्रष्टाचार विरोधी युनिटचे प्रमुख बनवण्यात आलं होतं. मात्र, त्यांना त्यांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही.
हेही वाचा :