हैदराबाद Rajat Patidar Replace Virat Kohli : 25 जानेवारीपासून इंग्लंडविरुद्ध सुरु होणाऱ्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी विराट कोहलीच्या जागी बीसीसीआयनं बदली खळाडूची घोषणा केलीय. विराट कोहलीच्या जागी त्याचा आरसीबीतील सहकारी रजत पाटीदारला भारतीय संघात संधी मिळालीय. विराट कोहलीनं वैयक्तिक कारणांमुळं पहिल्या दोन कसोटी सामन्यांतून माघार घेतलीय. विराट कोहलीच्या जागी सरफराज खानचंही नाव शर्यतीत होतं. मात्र सर्फराज खान सध्या भारत अ संघात खेळत आहे.
रजत पाटीदारची उत्कष्ट कामगिरी : रजत पाटीदार पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी हैदराबादमध्ये भारतीय संघात दाखल झालाय. रजत पाटीदारला त्याच्या उत्कृष्ट फॉर्मचा फायदा झाला असून त्याला सर्फराज खानऐवजी भारतीय संघात स्थान मिळालंय. भारत अ संघाकडून खेळताना रजत पाटीदारनं इंग्लंड लॉयन्सविरुद्ध 151 धावांची खेळी केली होती. तसंच गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही रजत पाटीदारनं भारत अ संघाकडून 111 धावांची खेळी केली होती. त्याच्या उत्कृष्ट फॉर्ममुळं रजत पाटीदारला भारतीय संघात एंट्री मिळालीय.
अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारासाठी भारतीय संघाचे रस्ते बंद : विराट कोहलीच्या जागी चेतेश्वर पुजाराला संघात स्थान मिळू शकतं, असा दावा केला जात होता. पुजारानं रणजी ट्रॉफीमध्ये उत्कृष्ट फॉर्म दाखवला असून अलीकडंच त्यानं द्विशतकही झळकावलंय. पण आता पुजारासाठी भारतीय संघाचे दरवाजे जवळपास बंद झाले आहेत. तर अजिंक्य रहाणेला रणजी ट्रॉफीमध्येही मोठी खेळी करता आलेली नाही. त्यामुळं त्याचंही पुनरागमन होण्याची शक्यता नाही. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतानं शुभमन गिल आणि श्रेयस अय्यरसारख्या युवा खेळाडूंवरच विश्वास दाखवलाय. मात्र, या दोन खेळाडूंना या मालिकेत कामगिरी करता आली नाही, तर त्यांना संघातील स्थान टिकवणं फार कठीण जाईल.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेचं वेळापत्रक :
- पहिला कसोटी : 25-29 जानेवारी, राजीव गांधी इंटरनेशनल स्टेडियम, हैदराबाद
- दुसरी कसोटी : 2-6 फेब्रुवारी, डॉ. वाईएस राजशेखर क्रिकेट स्टेडियम, विशाखापट्टणम
- तिसरी कसोटी : 15-19 फेब्रुवारी, सौराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम, राजकोट
- चौथी कसोटी : 23-27 फेब्रुवारी, जेएससीए इंटरनेशनल स्टेडियम, रांची
- पाचवी कसोटी : 7-11 मार्च, हिमाचल प्रदेश क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम, धर्मशाला
- इंग्लंडविरोधातील पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जायस्वाल, रजत पाटिदार, श्रेयस अय्यर, के एल राहुल (यष्टिरक्षक), के एस भरत (यष्टिरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उप कर्णधार), आवेश खान
- पाच कसोटी सामन्याच्या मालिकेसाठी इंग्लंडचा संघ :
बेन स्टोक्स (कर्णधार), रेहान अहमद, जेम्स एंडरसन, गस एटकिंसन, जॉनी बेयरस्टो (यष्टिरक्षक), शोएब बशीर, जॅक क्रॉली, बेन डकेट, बेन फॉक्स (यष्टिरक्षक), टॉम हार्टली, जॅक लीच, ओली पोप, ओली रॉबिन्सन, जो रूट आणि मार्क वुड
हेही वाचा :