नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग, सुरेश रैना, युवराज सिंग आणि गुरकीरत मान यांच्याविरोधात सोशल मीडियावर अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये दिव्यांगांची खिल्ली उडवल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार नॅशनल सेंटर फॉर प्रमोशन ऑफ एम्प्लॉयमेंट फॉर डिसेबल्ड पीपल (NCPEDP) चे कार्यकारी संचालक अरमान अली यांनी अमर कॉलनी पोलीस स्टेशनच्या SHO कडे केली आहे.
व्हिडिओ प्रसारित करणाऱ्या सोशल मीडियाविरोधातही तक्रार : क्रिकेटपटूंशिवाय मेटा इंडियाच्या उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संध्या देवनाथन यांच्याविरोधातही तक्रार दाखल करण्यात आली आहे. मेटा-मालकीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मनं अशी पोस्ट करण्याची परवानगी देऊन माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 चं उल्लंघन केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. अमर कॉलनी पोलीस ठाण्यात तक्रार प्राप्त झाली आहे आणि प्रकरणाच्या पुढील तपासासाठी ती जिल्ह्यातील सायबर सेलशी सामायिक केली जाईल, असं एका पोलिस अधिकाऱ्यानं सांगितलं
काय आहे व्हिडिओत : वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्सच्या अंतिम सामन्यात भारत चॅम्पियन्सनं पाकिस्तान चॅम्पियन्सचा पाच विकेट्सनं पराभव केल्यानंतर, माजी क्रिकेटपटूंनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये युवराज सिंग, हरभजन सिंग तसंच रैना लंगडत येताना आणि त्यांच्या शरीरावर सामन्याचा शारीरिक प्रभाव दाखवण्यासाठी त्यांची पाठ धरताना दिसत आहेत. अपंगांसाठी आवाज उठवणाऱ्या लोकांनी या व्हिडिओला घृणास्पद म्हटलं आहे. नॅशनल फोरम फॉर द राइट्स ऑफ पर्सन विथ डिसॅबिलिटीजनं या व्हिडिओला पूर्णपणे आक्षेपार्ह म्हटलं आहे.
काय लिहिलं तक्रारीत : या तक्रारीत म्हटलं की, सोशल मीडिया त्याच्या वापरकर्त्याच्या मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करण्यात अयशस्वी झालं, ज्यामुळं अपमानजनक व्हिडिओचा प्रसार होऊ शकला. हा व्हिडिओ प्रत्येक व्यक्तीला सन्मानानं जगण्याच्या अधिकाराची हमी देणाऱ्या भारतीय संविधानाच्या कलम 21 चं घोर उल्लंघन आहे. तक्रारीत अरमान अलीनं असंही म्हटलं की, "हे अपंग व्यक्तींचे हक्क अधिनियम, 2016 च्या कलम 92 आणि निपुण मल्होत्रा विरुद्ध सोनी पिक्चर्स फिल्म्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (2004 SCC ऑनलाइन SC 1639 ) प्रकरणात स्थापन केलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचं उल्लंघन करते. या क्रिकेटपटूंची साधी माफी पुरेशी नाही, त्यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा झाली पाहिजे," असं तक्रारदाक अरमान अली म्हणाले.
हेही वाचा :