छत्रपती संभाजीनगर Muralikant Petkar on Vinesh Phogat : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कुस्तीपटू विनेश फोगाट हिनं स्वतःचे वजन वाढत आहे का? याकडं स्वतःच लक्ष देणं गरजेचं आहे. झालेल्या प्रकाराला ती आणि तिचा प्रशिक्षक जबाबदार आहेत, त्याबाबत इतर कोणाला दोष देणं चुकीचे असल्याचं मत पाहिले पॅराऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांनी व्यक्त केलं. खेळाडू घडत असतो त्यावेळी त्यांना प्रसिद्धी देणं हे माध्यमांचे काम आहे. प्रत्येक वेळी त्यांची दखल घेतल्यास माहिती जगासमोर आणण्यासाठी चित्रपटाची गरज पाडणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.
चंदू चॅम्पियन मुळं जगासमोर आलो : नुकताच चंदू चॅम्पियन चित्रपट प्रदर्शित झाला. मुरलीकांत पेटकर या खेळाडूच्या जीवनावर आधारित हा चित्रपट सर्वांच्या पसंतीस उतरला. त्यांचा संघर्ष, त्यांनी केलेले प्रयत्न आणि खेळाप्रती त्यांचं योगदान जगासमोर आलं. वयाच्या 19 व्या वर्षी पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्यात 9 गोळ्या त्यांना लागल्या होत्या. त्यातील एक गोळी अजूनही त्यांच्या शरीरात अडकून आहे. आजही त्यांना दोन ते तीन तासांच्या वर एका ठिकाणी बसणं शक्य होत नाही. त्यांच्यात कुस्तीपटू ते दिव्यांग स्विमर ज्यानं भारताला पॅराऑलिम्पिक स्पर्धेत देशाला पाहिलं सुवर्ण पदक मिळवून दिलं, हा प्रवास काळाच्या पडद्याआड दडला होता. मुळात असा खेळाडू आहे, हेच कोणाला माहीत नव्हतं. मात्र त्यांच्यावर आधारित चंदू चॅम्पियन हा चित्रपट आला आणि अनेकांना माझ्याबद्दल माहिती झाली. आज अनेक विद्यार्थी प्रेरणा घेण्यासाठी माझ्याकडे येत असून कुठंही गेलो की असंख्य लोक आवर्जून भेटतात. कुस्ती खेळताना लहानपणी भेटलेला त्या काळाचा एक पैसा बक्षीस जपून ठेवलं आहे. मुलांना प्रेरणा मिळावी यासाठी मी त्यांना आवर्जून दाखवतो. असं मत मुरलीकांत पेटकर यांनी व्यक्त केलं.
पॅराऑलिम्पिकमध्ये देश चांगली कामगिरी करेल : मागील महिन्यात ऑलिम्पिक पार पडल्यानंतर आता पॅराऑलिम्पिक स्पर्धा 28 ऑगस्ट पासून सुरु होत आहे. या स्पर्धांमध्ये देश चांगली कामगिरी करेल असा विश्वास मुरलीधर पेटकर व्यक्त केला. चांगले खेळाडू असून फायदा नाही, तर त्यांना प्रशिक्षक देखील चांगले लागतात. आत नुकताच झालेल्या ऑलंपिक स्पर्धांमध्ये जो अभाव दिसून आला. मात्र पॅराऑलिम्पिक स्पर्धेत देश पहिल्यापेक्षा चांगली कामगिरी करेल. माझ्यावर आधारित चंदू चॅम्पियन हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना तो दाखवण्यात आला. त्यामुळं त्यात असलेला संघर्ष बघून खेळाडूंना प्रेरणा मिळाली. यात आम्ही जास्तीत जास्त पदक मिळवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांची कामगिरी चांगली होईल असा विश्वास असल्याचं यावेळी पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांनी सांगितलं.
ऑलिंपिक खेळात सुवर्णपदक न मिळाल्यानं व्यथित : नुकतीच जगातील पातळीवर असलेली ऑलिंपिक स्पर्धा पार पडली. यात 140 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात ज्याचं जगभरात नाव आहे, त्या देशाला एकही सुवर्णपदक जिंकता आलं नाही. त्यामुळं देशांसोबत मी देखील व्यथित झालो, असं मत पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांनी व्यक्त केलं. देशात खेळाची स्थिती सुधारत आहे. अनेक ठिकाणी व्यवस्था केली जात आहे. मात्र, ज्या ठिकाणी सुविधा आहेत तिथं खेळाडू नाही आणि जिथं खेळाडू आहेत तिथं सुविधा नाही अशी स्थिती देशात आहे. ग्रामीण भागात चांगले खेळाडू मिळू शकतात, विशेषतः आदिवासी भागात उत्तम खेळाडू देशाला मिळतील. मात्र तिकडे तशी सुविधा नाही. गाव खेड्यात चपळ मुलं अधिक असतात त्यामुळं नुसत्या शहरांमधे नाही तर छोट्या गावांमधे खेळांना प्राधान्य देऊन तिथं प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत, असं मत पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांनी व्यक्त केलं.
ग्रामीण भागात सुविधा हव्यात : भारताचं नाव जगात घेतले जात असले तरी ग्रामीण भाग आजही सुख सुविधांपासून दूर आहे. आधुनिक युगात महिलांना उघड्यावर शौचलयासाठी जावं लागतं, अंघोळ करावी लागते. अबाल वृद्धांना उतारवयात अडचण होते तर दिव्यांग व्यक्तींना त्रास सहन करावा लागतो. सरकारनं ग्रामीण भागात शौचालय तयार करावं त्यात कमोड असावेत. जेणं करुन होत असलेला त्रास दूर होईल अशी विनंती केंद्र आणि राज्य सरकारला करत असल्याचं पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांनी सांगितलं.
हेही वाचा :