मुंबई 10 Wickets in An Innings : क्रिकेटच्या इतिहासात गोलंदाजानं एका डावात सर्व 10 विकेट घेतल्याचे फार कमी प्रसंग आले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असा पराक्रम फक्त तीन वेळा झाला आहे. इंग्लंडचा महान गोलंदाज जिम लेकर, माजी भारतीय कर्णधार अनिल कुंबळे आणि एजाज पटेल (न्यूझीलंड) यांनी ही कामगिरी केली आहे. तिघांनीही कसोटी क्रिकेटमध्ये अशी कामगिरी केली.
A performance for the ages from the Mumbai lad! 🙌#MCA #Mumbai #Cricket #Wankhede #BCCI pic.twitter.com/YDt36LBrdb
— Mumbai Cricket Association (MCA) (@MumbaiCricAssoc) September 23, 2024
मुंबईच्या गोलंदाजाची विक्रमी कामगिरी : आता मुंबईच्या प्रतिष्ठित कांगा लीगमध्ये एका गोलंदाजानं एका डावात 10 पैकी 10 बळी घेतले. या गोलंदाजाचं नाव आहे, शोएब खान. डावखुरा फिरकी गोलंदाज शोएब कांगा लीग ई-विभागात गौड सारस्वत क्रिकेट क्लबकडून (गौड सारस्वत सीसी) खेळत होता. गव्हर्नमेंट लॉ कॉलेजच्या खेळपट्टीवर शोएबनं कोणताही ब्रेक न घेता सलग 17.4 षटकं गोलंदाजी केली आणि जॉली क्रिकेटर्सच्या सर्व 10 फलंदाजांना बाद केले.
शोएबच्या संघाचा विजय : शोएब खानच्या मारक गोलंदाजीमुळं जॉली क्रिकेटर्स संघ अवघ्या 67 धावांवर बाद झाला. प्रत्युत्तरात, गौड सारस्वतनं अंकुर दिलीपकुमार सिंगच्या नाबाद 27 धावांच्या जोरावर सहा विकेट्सवर 69 धावांवर डाव घोषित केला. यानंतर जॉली क्रिकेटर्सनं दुसऱ्या डावात 3 बाद 36 धावा केल्या. पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर गौड सारस्वतनं विजय मिळवला.
कुंबळे-लेकर आणि इजाज यांनी रचला इतिहास : इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज जिम लेकरनं 1956 मध्ये ऑस्ट्रेलियन विरुद्ध ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर इथं 53 धावांत 10 विकेट्स घेण्याचा अद्भुत विक्रम नोंदवला होता. तर अनिल कुंबळेनं 1999 मध्ये नवी दिल्लीत पाकिस्तानविरुद्ध 26.3 षटकांत 74 धावा देऊन 10 बळी घेतले होते. त्यानंतर अजाज पटेलनं डिसेंबर 2021 मध्ये भारताविरुद्धच्या वानखेडे कसोटी सामन्यात 119 धावांत 10 बळी घेतले.
कांगा लीगचा इतिहास काय : माजी क्रिकेटपटू डॉ. होरमसजी कांगा यांच्या स्मरणार्थ कांगा लीग स्पर्धेला सुरुवात झाली. होरमसजी कांगा यांनी 43 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 1905 धावा केल्या होत्या आणि 33 बळीही घेतले होते. कांगा लीग मुंबईतील आझाद मैदान, शिवाजी पार्क, क्रॉस मैदान इत्यादी विविध मैदानांवर खेळली जाते. महान फलंदाज सचिन तेंडुलकरही या लीगमध्ये खेळला आहे. सचिननं वयाच्या 11 व्या वर्षी जॉन ब्राइट क्रिकेट क्लबकडून 1984 मध्ये या लीगमध्ये पदार्पण केलं होतं. त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरनंही 2013 मध्ये कांगा लीगमध्ये पदार्पण केलं होतं.
हेही वाचा :