नवी दिल्ली Mohammed Shami Update : भारत आणि इंग्लंड यांच्यात 25 जानेवारीपासून ते 11 मार्चपर्यंत 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिल्या 2 कसोटी सामन्यांसाठी संघ जाहीर करण्यात आलाय. भारतीय क्रिकेट संघातील अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला या संघात स्थान मिळालेलं नाही. शमीला उरलेल्या तीन कसोटी सामन्यांसाठी संघात स्थान मिळेल, अशी आशा होती, मात्र आता तसं होताना दिसत नाही.
विश्वचषकाच्या अंतिम सामन्यानंतर खेळला नाही एकही सामना : विश्वसनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी इंग्लंड विरुद्धच्या संपूर्ण कसोटी मालिकेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. आयसीसी विश्वचषक 2023 मध्ये त्याच्या घोट्याला दुखापत झाली होती. तेव्हापासून तो दुखापतीतून सावरत आहे. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यानंतर त्यानं एकही सामना खेळलेला नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेसाठी शमीला संघात स्थान देण्यात आलं होतं, पण नंतर त्याला संघातून रिलीज करुन देण्यात आलं होतं. मात्र आता या दुखापतीमुळं त्याला इंग्लंडविरुद्धच्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेलाही मुकावं लागू शकतं.
लंडनमधील तज्ञांना भेटण्याचा सल्ला : बंगळुरु येथील नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये शमीच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्याचा अहवाल पाहिल्यानंतर डॉक्टरांनी शमीला लंडनमधील तज्ञांना भेटण्याचा सल्ला दिलाय. आता एनसीए स्पोर्ट्स सायन्स विभागाचे प्रमुख नितीन पटेल शमीसोबत लंडनला जाऊ शकतात. शमीनं गुरुवारी एनसीएमध्ये फलंदाजी केली. परंतु, गोलंदाजी करताना त्याला अडचणींचा सामना करावा लागला. जूनमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकापूर्वी बीसीसीआय शमीसोबत कोणतीही जोखीम घेऊ इच्छित नाही. एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत त्यानं चमकदार कामगिरी करत 7 बळी घेतले होते.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारताचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के एल राहुल (यष्टीरक्षक), के एस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान
पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेचं वेळापत्रक :
- पहिला सामना : 25 जानेवारी ते 29 जानेवारी, हैदराबाद
- दुसरा सामना : 02 फेब्रुवारी ते 06 फेब्रुवारी, विशाखापट्टणम
- तिसरा सामना : 15 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी, राजकोट
- चौथा सामना 23 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी, रांची
- पाचवा सामना : 07 मार्च ते 11 मार्च, धर्मशाळा
हेही वाचा :