पालघर Wrestler Sainath Pardhi News : जॉर्डनमधील अमान येथे सुरू असलेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत ग्रीक रोमन विभागातून भारतीय संघाच्या साईनाथ पारधी या आदिवासी युवकानं 51 किलो वजन गटात कांस्यपदक पटकावलं. कझाकिस्तानच्या येरासी मुस्सान या पैलवानाला तीन विरुद्ध एक गुणांनी चितपट करून त्यानं हे यश संपादन केलंय. साईनाथ पारधी हा पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील गोऱ्हे येथील रहिवासी आहे. सुरुवातीला त्यानं भाईंदर येथील गणेश आखाड्यातून कुस्तीचे धडे गिरवले. कुस्ती प्रशिक्षक सदानंद पाटील यांनी साईनाथला मोलाची मदत केली.
‘मिशन ऑलिम्पिक’चा फायदा : ‘जाणता राजा कुस्ती केंद्रा’चे प्रमुख पैलवान संदीपान भोंडवे यांनी महाराष्ट्रातील कुस्तीगिरांनी ऑलिम्पिक पदक मिळवावं या उद्देशानं ‘मिशन ऑलिम्पिक’ ही योजना सुरू केली. या योजनेत कुस्तीगिरांची निवड करण्यासाठी जानेवारी 2021 मध्ये जाणता राजा कुस्ती केंद्रावर महाराष्ट्रातील पंधरा वर्षांखालील कुस्तीगिरांच्या निवड चाचणीचे आयोजन करण्यात आलं होते. या चाचणीत महाराष्ट्रातील 166 पैलवानांनी सहभाग घेतला. त्यातून ‘मिशन ऑलिम्पिक’साठी दहा पैलवानांची निवड करण्यात आली. त्यात साईनाथचाही सहभाग होता.
भोंडवे यांच्या सल्ल्यानुसार खेळात बदल : निवड झालेल्या कुस्तीगिरांची राहण्याची सोय, भोजन, खुराक आणि प्रशिक्षणाचा सर्व खर्च पैलवान संदीप भोंडवे अध्यक्ष असलेले ड्रीम फाउंडेशन जाणता राजा कुस्ती केंद्र करत आहे. साईनाथ पारधी याची 42 किलो फ्रीस्टाइल विभागात ‘मिशन ऑलिम्पिक’साठी निवड करण्यात आली होती. साईनाथचा दहा ते बारा महिन्यांचा कुस्तीचा सराव पाहून त्याचे वस्ताद संदीप भोंडवे यांनी त्याला ग्रीको रोमन प्रकारात खेळण्याचा सल्ला दिला. त्यानंतर साईनाथचा ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धेचा सराव सुरू झाला.
आयुष्यातील पहिल्याच स्पर्धेत कांस्यपदक : साईनाथ जाणता राजा कुस्ती केंद्रात येण्याच्या अगोदर कधीच कोणती स्पर्धा खेळला नव्हता. त्याच्या आयुष्यातली पहिली कुस्ती स्पर्धा 2002 मधील पंधरा वर्षाखालील राष्ट्रीय फेडरेशन स्पर्धा होती. त्यामध्ये त्यानं कांस्यपदक पटकावलं. त्या पाठोपाठ झालेल्या राष्ट्रीय ग्रँड फिक्स स्पर्धेत देखील त्याला कांस्यपदक मिळालं.
जिद्द आणि परिश्रमानं जागतिक पदाला गवसणी : साईनाथनं या वर्षी पंधरा वर्षाखालील राष्ट्रीय अंजिक्य कुस्ती स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली होती. 2024 मध्ये पंधरा वर्षाखालील आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा झाली. त्यात देखील साईनाथनं भारताच्या वतीनं प्रतिनिधित्व केलं. आता जॉर्डनमध्ये झालेल्या जागतिक ग्रीको रोमन कुस्ती प्रकारातील 51 किलो वजन गटात साईनाथ पारधीनं कझाकिस्तानच्या येरासी मुस्सान याचा पराभव करून कांस्यपदकावर आपलं नाव कोरलंय. आदिवासी समाजातून आलेला एक मुलगा आपल्या मेहनतीच्या आणि जिद्दीच्या जोरावर कुस्ती स्पर्धेत जागतिक पातळीवर आपलं नाव करतो, याचा पालघर जिल्ह्याला अभिमान आहे.
हेही वाचा -
- विनेशच्या स्वागतावेळी बजरंगनं सर्व मर्यादा ओलांडत केला तिरंग्याचा अपमान? नेटिझन्सनं कुस्तीपटूला फटकारलं - Bajrang Punia Criticised
- विनेश फोगट भारतात परतली, स्वागतासाठी मोठी गर्दी; बजरंग-साक्षी आणि कुटुंबीयांना पाहून अश्रू अनावर, पाहा व्हिडिओ - Vinesh Phogat Paris Olympics
- पॅरिसमध्ये 21 वर्षीय अमननं रचला इतिहास! अखेर भारताला कुस्तीत पदक मिळालं - Paris 2024 Olympics