लखनऊ LSG vs KKR IPL 2024 : भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियमध्ये लखनऊ संघ आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन संघात आयपीएलमधील 54 वा खेळवण्यात आला. या सामन्यात कोलकाता संघानं लखनऊ संघावर 98 धावांनी मात केली. या विजयासह कोलकाता संघानं गुणतालिकेत अव्वलस्थान पटकावलं. प्रथम फलंदाजी करताना कोलकाता संघानं लखनऊ संघाला 236 धावांचं लक्ष्य दिलं होतं. मात्र प्रत्युत्तरात लखनऊचा संघ केवळ 137 धावाच करू शकला. कोलकाता संघाकडून सुनील नारायणनं 81 धावांची जोरदार खेळी केली.
कोलकाता संघानं लखनऊला दिलं 236 धावांचं लक्ष्य : भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात सामना खेळवला गेला. या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या कोलकाता नाईट रायडर्सनं 20 षटकात 6 गडी गमावून 235 धावा केल्या. या मैदानावरील टी-20 मधील ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. या सामन्यात कोलकाता संघानं दमदार सुरुवात केली. सुनील नारायण, फिल सॉल्ट यांच्यात पहिल्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी झाली. मात्र ही भागीदार मोठी होईल, असं वाटत असतानाच फिल सॉल्ट 32 धावा करून तंबूत परतला. तर सुनिल नारायणनं 81 धावांची जोरदार खेळी केली. त्यानं सहा चौकार आणि सात षटकार ठोकले. मात्र रवी बिश्नोईनं त्याचा बळी टिपत त्याला तंबूची वाट दाखवली. कोलकाता संघाला तिसरा धक्का आंद्रे रसेलच्या रूपानं बसला. नवीन-उल-हकनं त्याला बाद केलं, त्याला केवळ 12 धावाच करता आल्या. यानंतर युधवीर सिंहनं अंगकृष्ण रघुवंशी याच्यावर निशाणा साधला. तो 26 चेंडूत 32 धावांची खेळी खेळून तंबूत परतला. या सामन्यात रिंकू सिंगनं 16 धावा, श्रेयस अय्यरनं 23 धावा, रमणदीप सिंगनं 25 धावा आणि व्यंकटेश अय्यरनं 1 धाव केली. रमणदीप आणि व्यंकटेश नाबाद राहिले. लखनऊकडून नवीन-उल-हकनं तीन बळी घेतले. तर यश ठाकूर, रवी बिश्नोई, युधवीर सिंग यांना प्रत्येकी एक बळी मिळवण्यात यश आलं. कोलकाता संघानं सुनील नारायणच्या जोरदार खेळीच्या बळावर लखनऊ संघाला 236 धावाचं लक्ष्य दिलं.
लखनऊची फलंदाजी ढेपाळली : कोलकाता संघानं लखनऊ संघाला 236 धावांचं लक्ष्य दिलं. मात्र या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनऊ संघाची फलंदाजी ढेपाळली. लखनऊ संघानं केवळ 20 धावांवर अर्शिन कुलकर्णीचा बळी गमावला. त्यानं केवळ 9 धावा करुन तंबूचा रस्ता धरला. अर्शिन कुलकर्णीनंतर फलंदाजीला आलेल्या मार्कस स्टॉइनिसनं कर्णधार के एल राहुलसोबत मिळून लखनऊचा डाव सावरला. या जोडीनं मिळून 6 षटकात 55 धावसंख्या केली. मात्र संघाची 70 धावसंख्या असताना कर्णधार के एल राहुल 22 धावांवर तंबूत परतला. त्यानंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी लखनऊच्या फलंदाजांना डोकं वर काढायला संधीचं दिली नाही. लखनऊचा संघ केवळ 137 धावांवर ऑलआऊट झाला.
कोलकाता संघ गुणतालिकेत अव्वल : या सामन्यात लखनऊ संघात मयंक यादवच्या जागी यश ठाकूरला संधी देण्यात आली. दुसरीकडं मात्र कोलकात्याच्या प्लेइंग 11 मध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. दोन्ही संघांना प्लेऑफमध्ये जाण्याची दाट शक्यता होती. लखनऊचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर होता, तर कोलकाता दुसऱ्या क्रमांकावर होता. या सामन्यात कोलकाता संघानं बाजी मारत अव्वलस्थानी झेप घेतली. मोसमात दोन्ही संघांमध्ये यापूर्वीच सामना झाला. 28 एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात कोलकाताने 8 विकेट्सनं विजय मिळवला होता. त्यानंतर रविवारी झालेल्या सामन्यातही कोलकाता संघ वरचढ ठरला.
कोलकाता नाईट रायडर्सचा प्लेइंग 11 : फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक), सुनील नरेन, अंगक्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा.
लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग 11 : केएल राहुल (यष्टीरक्षक/कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, ॲश्टन टर्नर, आयुष बडोनी, कृणाल पांड्या, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, मोहसिन खान, यश ठाकूर.