विशाखापट्टणम Sunil Narine : कोलकाता नाइट रायडर्सचा सलामीवीर फलंदाज सुनील नारायणनं बुधवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात 21 चेंडूंत अर्धशतक झळकावलं. सुनील नारायणला आयपीएल 2024 मध्ये पहिलं शतक झळकावण्याची संधी होती, पण तो 39 चेंडूत 85 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. सुनील नारायणनं आपल्या डावात 7 षटकार तसंच 7 चौकार ठोकले. अष्टपैलू सुनील नारायणनं दिल्ली कॅपिटल्सचे दोन गोलंदाज इशांत शर्मा तसंच रशीख सलाम यांच्या षटकात एकूण 44 धावा केल्या. या स्फोटक खेळीमुळं कोलकाता नाईट रायडर्सनं प्रथम फलंदाजी करताना पॉवरप्लेमध्ये 6 षटकांत एक गडी गमावून 88 धावा केल्या.
21 चेंडूत 236 च्या स्ट्राईक रेटनं धावा : पॉवरप्लेच्या शेवटच्या चेंडूवर सुनील नारायणनं अर्धशतक पूर्ण केलं. त्यानं 21 चेंडूत 236 च्या स्ट्राईक रेटनं 6 चौकार तसंच 4 षटकारांच्या मदतीनं 50 धावा पूर्ण केल्या. पॉवरप्लेदरम्यान त्यानं इशांत शर्माच्या एका षटकात 26 धावा केल्या. सुनील नारायणनं या षटकात तीन षटकारासह दोन चौकार लगावले. यानंतर पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात सुनील नारायणनं रसिक सलामविरुद्ध तीन चौकार तसंच एक षटकार ठोकला. या षटकात त्यानं 18 धावा केल्या.
केकेआरची दुसरी सर्वोत्तम धावसंख्या : आयपीएलच्या पॉवरप्लेमधील केकेआरची ही दुसरी सर्वोत्तम धावसंख्या आहे. यापूर्वी कोलकाता नाइट रायडर्सनं 2017 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध पॉवरप्लेमध्ये एकही विकेट न गमावता 105 धावा केल्या होत्या. आज (2024) कोलकातानं दिल्लीविरुद्ध एक गडी गमावून 88 धावा केल्या आहेत.
हे वाचलंत का :
मुंबई इंडियन्सचा दारूण पराभव! राजस्थान रॉयल्सचा 6 गडी राखून दणदणीत विजय - MI vs RR IPL 2024