गुजरात KKR vs SRH : हैदराबादकडून राहुल त्रिपाठीने 55 धावांची खेळी केली. पॅट कमिन्स आणि हेनरिक क्लासेन यांनी छोटेखानी खेळी केली. कोलकात्याला 160 धावांचे आव्हान दिलं होतं. हे आव्हान कोलकात्यानं सहज गाठलं. त्यामुळं कोलकाता संघ थेट फायनलमध्ये पोहचला आहे, तर पराभूत संघ क्वालिफायर 2 मध्ये खेळणार आहे.
राहुल त्रिपाठीला अश्रू अनावर : मिचेल स्टार्कच्या भेदक माऱ्यासमोर हैदराबादची फलंदाजी ढेपाळली. आयपीएलमध्ये अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेड यांनी प्रतिस्पर्धी संघाची भंबेरी उडवली होती. पण कोलकात्याविरोधात प्लेऑफच्या सामन्यात स्टार्कने भेदक मारा करत हैदराबादची दाणादाण उडवली. पण मराठमोळ्या राहुल त्रिपाठीने एकट्याने झुंज दिली. राहुल त्रिपाठी याने शानदार अर्धशतक ठोकत हैदराबादच्या डावाला आकार दिला. पण तो धावबाद झाला. त्यानंतर राहुल त्रिपाठी याला अश्रू अनावर आले.
मिचेल स्टार्कचा भेदक मारा : मिचेल स्टार्क याने पहिल्याच षटकात ट्रेविस हेड याला तंबूत पाठवले. ट्रेविस हेड याचा स्टार्कने अप्रतिम चेंडूवर त्रिफाळा उडवला. हेड बाद झाल्यानंतर अभिषेक शर्माही टिकू शकला नाही. अभिषेक शर्मा फक्त तीन धावा काढून तंबूत परतला. अभिषेक शर्माला वैभव अरोरा याने रसेलकरवी झेलबाद केले. नितीश रेड्डीही फार काळ मैदानात टिकू शकला नाही. रेड्डी 10 चेंडूत 9 धावा काढून बाद झाला. यामध्ये एका चौकाराचा समावेश होता. रेड्डी आणि शाहबाद अहमद यांना स्टार्क याने एकापाठोपाठ एक तंबूत धाडले. शाहबाज अहमद याला खातेही उघडता आले नाही. 5 षटकांमध्ये हैदाराबादने 39 धावांच्या मोबदल्यात 4 विकेट गमावल्या होत्या.
नरेंद्र मोदी स्टेडियमवर मिचेल स्टार्क याने खतरनाक गोलंदाजी केली. स्टार्क याने हैदराबादच्या तीन फलंदाजांना तंबूत धाडले. त्याशिवाय वरुण चक्रवर्ती याने दोन विकेट घेतल्या. आंद्रे रसेल, सुनील नारायण, हर्षित राणा आणि वैभव अरोरा यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.