कोलकाता IPL 2024 KKR vs RR : संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स (RR) संघानं इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 मध्ये आपला विजयरथ कायम ठेवलाय. राजस्थाननं मंगळवारी ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या रोमहर्षक सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) 2 गडी राखून पराभव केला. या विजयासह राजस्थान संघानं गुणतालिकेत आपलं अव्वलस्थान कायम ठेवलंय. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान संघानं आतापर्यंत 7 पैकी 6 सामने जिंकले आहेत. या विजयासह राजस्थान संघानं आपलं अव्वलस्थान आणखी मजबूत केलंय. तर दुसरीकडं, कोलकाता संघानं आतापर्यंत 6 पैकी 4 सामने जिंकले आहेत.
बटलरनं एकहाती मिळवून दिला विजय : ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या सामन्यात कोलकाता संघानं राजस्थानला 224 धावांचं लक्ष्य दिलं होतं. याला प्रत्युत्तर देताना राजस्थानचा संघ सुरुवातीपासूनच गडबडताना दिसत होता. विजयासाठी 15 चेंडूत 38 धावांची गरज होती. त्यावेळी जॉस बटलर क्रीजवर होता. राजस्थानसाठी बटलरनं एकहाती सामना जिंकला. तसंच त्यानं आपलं शतकही पूर्ण केले. बटलरनं 60 चेंडूत 107 धावांची नाबाद खेळी केली. यात त्यानं 6 षटकार आणि 9 चौकार मारले. विशेष म्हणजे या हंगामातील हे त्याचं दुसरं शतक आहे.
पराग आणि पॉवेलची आक्रमक खेळी : बटलरच्या खेळीमुळं राजस्थाननं 8 विकेट्स गमावूनही सामना जिंकला. बटलरशिवाय रियान परागनं 14 चेंडूत 34 धावा केल्या. शेवटी रोव्हमन पॉवेलनंही 13 चेंडूत 26 धावा केल्या. बटलर आणि पॉवेल यांच्यात 27 चेंडूत 57 धावांची भागीदारी झाली. जी खूप निर्णायक ठरली. दुसरीकडं केकेआर संघाकडून हर्षित राणा, सुनील नरेन आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी 2-2 बळी घेतले. तर वैभव अरोराला 1 विकेट मिळाली.
नरेनचं झंझावाती शतक : या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या कोलकाता संघानं 6 गडी गमावून 223 धावा केल्या. सलामीला आलेल्या सुनील नरेननं संघासाठी तुफानी फलंदाजी करत 49 चेंडूत शतक झळकावलं. या सामन्यात नरेनने 56 चेंडूत एकूण 109 धावांची खेळी केली. यात त्यानं 6 षटकार आणि 13 चौकार लगावले. तर आंगकृष्ण रघुवंशीनं 30 धावा केल्या. दुसरीकडं राजस्थान संघाचे सर्व गोलंदाज चांगलेच हतबल झाल्याचं दिसून आलं. दरम्यान, आवेश खाननं चांगली गोलंदाजी करत 2 बळी घेतले. तर कुलदीप सेनलाही 2 विकेट मिळाल्या. ट्रेंट बोल्ट आणि युझवेंद्र चहल यांना 1-1 विकेट मिळाली.
हेही वाचा :