मुंबई End of Rohit-Virat Era : न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय क्रिकेट संघाला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. या मालिकेत भारताला 0-3 असा पराभव पत्करावा लागला. भारतीय संघाच्या पराभवामागे त्यांची कमकुवत फलंदाजी हेच कारण होतं. भारतीय संघाच्या फलंदाजांनी न्यूझीलंडविरुद्ध अत्यंत खराब कामगिरी केली. त्यामुळं या मालिकेत एकदाही भारतीय संघ चांगल्या स्थितीत दिसली नाही. चांगल्या धावसंख्येची जबाबदारी विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या स्टार फलंदाजांवर आहे. मात्र या दोघांची आकडेवारी इतर फलंदाजांच्या तुलनेत खूपच खराब आहे.
Virat Kohli dismissed for 1 in 7 balls. pic.twitter.com/xKw8C6RokF
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 3, 2024
घरच्या मैदानावरही केली नाही फलंदाजी : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा या मालिकेत वेगवान गोलंदाजीबद्दल खूप चिंतेत दिसत होता. तर फिरकीपटूंनी विराट कोहलीला खूप त्रास दिला आहे. या दोन खेळाडूंच्या आकडेवारीवर एक नजर टाकली तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. रोहित शर्मानं गेल्या 10 डावात केवळ 133 धावा केल्या आहेत. तर विराट कोहलीनं शेवटच्या 10 कसोटी डावांमध्ये 192 धावा केल्या आहेत. या दोन्ही फलंदाजांनी घरच्या मैदानावर सर्व 10 डाव खेळले आहेत. देशांतर्गत परिस्थितीत या दोन स्टार्सची अवस्था अशी असताना ऑस्ट्रेलियात काय होणार, हा विचार करण्यासारखा विषय आहे.
शेवटच्या 10 डावात सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज :
- 470 धावा - शुभमन गिल
- 431 धावा - अक्षर पटेल
- 422 धावा - ऋषभ पंत
- 379 धावा - यशस्वी जैस्वाल
- 354 धावा - वॉशिंग्टन सुंदर
- 339 धावा - केएल राहुल
- 309 धावा - सर्फराज खान
- 282 धावा - अजिंक्य रहाणे
Rohit Sharma dismissed for 11 in 11 balls. pic.twitter.com/dQzk7Kzskc
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 3, 2024
या यादीत विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या नावाचा समावेश नाही. केएल राहुल त्याच्या फॉर्ममुळं ट्रोल झाला असला तरी त्यानं शेवटच्या 10 कसोटी डावांमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मापेक्षा जास्त धावा केल्या आहेत. या यादीत वॉशिंग्टन सुंदरही या दोघांच्या पुढं आहे. अशी आकडेवारी पाहता या दोन महान खेळाडूंचं युग हळूहळू संपत असल्याचं स्पष्ट झालं आहे. भारतीय संघ लवकरच बदलाच्या काळातून जाणार आहे.
ऑस्ट्रेलियात भोगावे लागणार परिणाम : रोहित शर्मा आणि विराट कोहलीला लवकरात लवकर फॉर्म परत मिळवावा लागेल. अन्यथा भारतीय संघाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. भारतीय क्रिकेट संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेतील पहिला सामना 22 नोव्हेंबरपासून होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघही जाहीर करण्यात आला आहे. भारताला ही मालिका जिंकायची असेल, तर विराट कोहली आणि रोहित शर्माला आपले आकडे सुधारावे लागतील.
हेही वाचा :