धर्मशाळा IPL 2024 PBKS vs CSK : : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या 17 व्या हंगामातील सामना क्रमांक-53 मध्ये, चेन्नई सुपर किंग्सनं (CSK) 'पंजाब किंग्स'चा (PBKS) 28 धावांनी पराभव केलाय. रविवारी (5 मे) धरमशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात यजमान पंजाब संघासमोर विजयासाठी 168 धावांचं लक्ष्य होतं. ज्याचा पाठलाग करताना संघ 9 विकेट्सवर 139 धावाच करू शकला. रुतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली सीएसकेचा चालू मोसमातील 11 सामन्यांतील हा सहावा विजय होता. गुणतालिकेत ते तिसरे स्थान गाठलं. दुसरीकडं, पंजाब किंग्जचा 11 सामन्यांतील हा सातवा पराभव ठरला.
रवींद्र जडेजानं केली चमकदार कामगिरी : चेन्नई सुपर किंग्जच्या विजयाचा हिरो ठरला अष्टपैलू कामगिरी करणारा रवींद्र जडेजा. जडेजानं प्रथम फलंदाजी करताना 43 धावा केल्या. त्यानंतर तीन बळीही घेतले. पंजाब किंग्जच्या फलंदाजीत प्रभसिमरन सिंग, शशांक सिंगनं देखील चमत्कार केलाय. प्रभावसिमरननं 30, शशांक सिंगनं 27 धावा केल्या. चेन्नईकडून जडेजा व्यतिरिक्त सिमरजित सिंग तसंच तुषार देशपांडे यांनीही शानदार कामगिरी केली. दोन्ही वेगवान गोलंदाजांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
धोनीला खातेही उघडता आलं नाही : नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जनं 9 गडी गमावून 167 धावा केल्या. सीएसकेकडून रवींद्र जडेजानं सर्वाधिक 43 धावा केल्या. जडेजानं 26 चेंडूंच्या खेळीत तीन चौकारासह दोन षटकार ठोकले. कर्णधार रुतुराज गायकवाडनं 32, डॅरिल मिशेलनं 30 धावांचं योगदान दिलं. माजी कर्णधार महेंद्रसिंगला खातंही उघडता आले नाही. तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्याला हर्षल पटेलनं क्लीन बोल्ड केलं. पंजाबकडून हर्षल पटेल, राहुल चहरनं प्रत्येकी तीन बळी घेतले. तर अर्शदीप सिंगनं दोन बळी घेण्यात यश आलं.
हेड टू हेड रेकॉर्ड काय : आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात नेहमीच चुरशीची स्पर्धा पाहायला मिळते. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 30 सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी चेन्नईनं 15 सामने जिंकले आहेत, तर पंजाबनंही 15 सामन्यांमध्ये यश मिळवले आहे. या मोसमात दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमनेसामने आले आहेत. याआधी 1 मे रोजी चेपॉक इथं दोन्ही संघांमध्ये सामना झाला होता, ज्यात पंजाब किंग्जनं सात गडी राखून विजय मिळवला होता.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन :
- चेन्नई सुपर किंग्जची प्लेइंग-11 : अजिंक्य रहाणे, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, रिचर्ड ग्लीसन, तुषार देशपांडे
- पंजाब किंग्जची प्लेइंग-11 : जॉनी बेअरस्टो, रिले रोसो, शशांक सिंग, सॅम कुरान (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, राहुल चहर, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग.
हेही वाचा :
- सात दिवसांत बंगळुरुकडून गुजरात दुसऱ्यांदा पराभूत; आरसीबीचं स्पर्धेतील आव्हान जिवंत - RCB vs GT
- घरच्या मैदानात मुंबईची 'पलटन' गारद; बारा वर्षानंतर कोलकाता संघानं मुंबई संघाला 'वानखेडेवर' चारली धूळ - MI vs KKR
- भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का; कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थान गमावलं, कोणत्या संघानं केला अव्वल स्थानावर कब्जा? - ICC Rankings