मुंबई MI vs KKR IPL 2024 : आयपीएल 2024 च्या हंगामातील 51 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात वानखेडे मैदानावर शुक्रवारी खेळवण्यात आला. या सामन्यात वानखेडे मैदानावर खेळताना तब्बल 12 वर्षानंतर कोलकाता संघानं मुंबई इंडियन्स संघावर मात केली. कोलकाता संघानं प्रथम फलंदाजी स्वीकारत मुंबई संघाला 170 धावांचं लक्ष्य दिलं. मात्र प्रत्युत्तरात मुंबईचा संघ 18.5 षटकात 145 धावांवर गारद झाला. मुंबईकडून सूर्यकुमार यादव जोरदार खेळाचं प्रदर्शन केलं. मात्र मुंबईचं जहाज पराभवाच्या वादळातून बाहेर काढण्यास त्याला यश आलं नाही.
कोलकाता संघानं मुंबईला दिलं 170 धावांचं आव्हान : मुंबईतील वानखेडे मैदानात खेळताना नाणेफेक जिंकून मुंबई संघानं कोलकाता संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. मात्र प्रथम फलंदाजीला आलेला कोलकाता संघ मुंबईविरोधात मोठा संघर्ष करताना दिसला. कोलकाता संघानं केवळ 57 धावांवर 5 गडी गमावले. या सामन्यात सॉल्टनं केवळ 5 धावा केल्या, तर रघुवंशीनं 13 धावा काढल्या. श्रेयस अय्यर 6 धावा काढून बाद झाला, सुनील नरेननं 8 धावापर्यंत मजल मारली तर रिंकू सिंगनं 9 धावांसाठी संघर्ष केला. पहिले 5 फलंदाज स्वस्तात माघारी परतल्यानंतर मयंक पांडे आणि व्यंकटेश अय्यर यांनी सामन्याची सूत्रं आपल्या हाती घेतली. या दोघांनी सावध खेळ करत 62 चेंडूत 83 धावा केल्या. मयंक पांडेला हार्दिक पांड्यानं तंबूचा रस्ता दाखवला. त्यानं 42 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर पुन्हा कोलकाता संघाची 17 व्या षटकात पडझड झाली. आंद्रे रसेल 7 धावा काढून माघारी परतला. कोलकाता संघानं व्यंकटेश अय्यरच्या अर्धशतकाच्या जोरावर 169 धावा करुन मुंबई संघाला 170 धावांचं आव्हान दिलं.
मुंबईची पलटन झाली गारद : कोलकाता संघानं दिलेलं 170 धावांचं माफक लक्ष्य घेऊन मुंबई संघ मैदानात उतरला. मात्र मुंबईची सुरुवात फारच निराशाजनक झाली. मुंबई संघानं 3 गडी स्वस्तात गमावले. यात रोहित शर्मा 11 धावा काढून तंबूत परतला, इशान किशन 13 धावा आणि नमन धीर 11 धावा करुन तंबूत परतले. त्यानंतर मात्र सूर्यकुमार यादव मैदानात आला. मुंबईचे एकापाठोपाठ एक फलंदाज बाद होत असताना सूर्यकुमार यादव मात्र मैदानात तळ ठोकून होता. त्यानं 35 चेंडूत 56 धावा केल्या. सूर्यकुमार यादव मुंबईला एकहाती विजय मिळवून देणार असं वाटत असताच आंद्रे रसेलनं त्याला तंबूत पाठवलं. त्यामुळे मुंबई संघाच्या विजयाच्या आशा मावळल्या. सूर्यकुमार यादवनं 56 धावात 6 चौकार आणि 2 छानदार षटकार ठोकले. कोलकाता संघाकडून आंद्रे रसेलनं हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादवची महत्वपूर्ण विकेट घेतली. तर सुनील नरेन, वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले. तर मिचेल स्टार्कनं 4 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. या सामन्यासह मुंबई संघाच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा मावळल्या आहेत.
मुंबईचं आव्हान संपुष्टात : या हंगामात आपलं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी मुंबई इंडियन्सला या सामन्यात कोणत्याही परिस्थितीत विजय आवश्यक होता. या सामन्यात पराभव झाल्यानं मुंबईचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं. दुसरीकडं कोलकाता संगानं हा सामना जिंकून प्लेऑफसाठी आपली दावेदारी मजबूत केली.
हेड टू हेड रेकॉर्ड : आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आतापर्यंत 32 सामने खेळले गेले आहेत. यात मुंबई इंडियन्सनं 23 सामने जिंकले आहेत. तर कोलकाता नाईट रायडर्सनं केवळ 10 सामने जिंकले. गेल्या वेळी दोन्ही संघांमध्ये सामना झाला होता, त्यात मुंबई इंडियन्सनं 5 विकेट्सनं विजय मिळवला होता.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन :
मुंबई इंडियन्स : इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नेहल वढेरा, हार्दिक पंड्या (कर्णधार), नमन धीर, टीम डेव्हिड, गिराल्ड कोएत्झी, पियुष चावला, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा.
इम्पॅक्ट खेळाडू : रोहित शर्मा, शम्स मुलानी, शिवालिक शर्मा, देवाल्ड ब्रेविस, रोमॅरियो शेफर्ड.
कोलकाता नाईट रायडर्स : फिल सॉल्ट (यष्टीरक्षक), सुनील नरेन, अंगक्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती.
इम्पॅक्ट खेळाडू : अनुकुल रॉय, मनीष पांडे, श्रीकर भारत, शेरफेन रदरफोर्ड, चेतन साकारिया.
हेही वाचा :