चेन्नई IPL 2024 Final : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 मधील 73 सामन्यांनंतर आज अंतिम सामना आहे. या अंतिम सामन्यात या हंगामातील दोन बलाढ्य संघ कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) आमनेसामने आहेत. एसआरएच संघाचं कर्णधारपद पॅट कमिन्सकडं तर केकेआरची कमान श्रेयस अय्यरकडं आहे.
पॅट कमिन्सला इतिहास रचण्याची संधी : चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियमवर होणारा हा अंतिम सामना पॅट कमिन्सनं म्हणजेच एसआरएचनं जिंकला तर तो अनोखा इतिहास रचू शकेल. खरं तर, जेव्हा जेव्हा परदेशी संघाच्या कर्णधारानं आयपीएल फायनल जिंकली आहे, तेव्हा ती नेहमीच ऑस्ट्रेलियन कर्णधारानंच जिंकली आहे. ऑस्ट्रेलिया व्यतिरिक्त कोणत्याही देशाच्या कर्णधाराला अंतिम सामना जिंकता आलेला नाही. अशा परिस्थितीत कमिन्सला शेन वॉर्न, ॲडम गिलख्रिस्ट आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या आयपीएल क्लबमध्ये सामील होण्याची संधी आहे. जर कमिन्सच्या एसआरएचनं आयपीएल फायनलमध्ये अय्यरच्या केकेआरचा पराभव केला तर 8 वर्षांनंतर परदेशी कर्णधाराच्या नेतृत्वाखालील संघ आयपीएलमध्ये विजेता होईल. अशा परिस्थितीत काव्या मारनच्या संघाच्या कर्णधाराला इतिहास रचण्याची संधी आहे. यामुळं आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा तो चौथा परदेशी कर्णधार ठरणार आहे.
आतापर्यंत तीन ऑस्ट्रेलियन कर्णधारांनी जिंकला अंतिम सामना : 2008 मध्ये आयपीएलचा उद्घाटन हंगाम राजस्थान रॉयल्स संघानं जिंकला होता, तेव्हा या संघाची कमान शेन वॉर्नच्या हाती होती. पुढच्या वर्षी 2009 मध्ये डेक्कन चार्जर्सनं आयपीएलचं जेतेपद पटकावलं, तेव्हा ऑस्ट्रेलियाचा अनुभवी ॲडम गिलख्रिस्ट हा डेक्कन चार्जर्सचा कर्णधार होता. त्यानंतर 2016 साल आलं, जेव्हा आयपीएल फायनल सनरायझर्स हैदराबादनं (SRH) जिंकली. त्यावेळी हैदराबाद संघाची कमान डेव्हिड वॉर्नरच्या हाती होती. म्हणजेच प्रत्येक वेळी परदेशी कर्णधारानं आयपीएलचं जेतेपद पटकावलं तेव्हा त्यांची कमान कांगारु खेळाडूच्या हाती आलीय. अशा स्थितीत पॅट कमिन्स हे करु शकणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सर्वाधिक आयपीएल विजेते कर्णधार :
- मुंबई इंडियन्स : 5 वेळा (2013, 2015, 2017, 2019, 2020) कर्णधार रोहित शर्मा
- चेन्नई सुपर किंग्स : 5 वेळा (2010, 2011, 2018, 2021, 2023) कर्णधार महेंद्रसिंग धोनी
- कोलकाता नाईट रायडर्स : 2 वेळा (2012 आणि 2014) कर्णधार गौतम गंभीर
- सनरायझर्स हैदराबाद : 1 वेळ (2016) कर्णधार डेव्हिड वॉर्नर
- डेक्कन चार्जर्स : 1 वेळ (2009) कर्णधार ॲडम गिलख्रिस्ट
- राजस्थान रॉयल्स : 1 वेळा (2008) कर्णधार शेन वॉर्न
आतापर्यंतचे आयपीएलचे विजेते :
- 2008 राजस्थान रॉयल्सनं चेन्नई सुपर किंग्जचा 3 गडी राखून पराभव केला
- 2009 डेक्कन चार्जर्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगलुरुचा 6 धावांनी पराभव केला
- 2010 चेन्नई सुपर किंग्जनं मुंबई इंडियन्सचा 22 धावांनी पराभव केला
- 2011 चेन्नई सुपर किंग्जनं रॉयल चॅलेंजर्स बंगलुरुचा 58 धावांनी पराभव केला
- 2012 कोलकाता नाईट रायडर्सनं चेन्नई सुपर किंग्जचा 5 विकेट्सनं पराभव केला
- 2013 मुंबई इंडियन्सनं चेन्नई सुपर किंग्जचा 23 धावांनी पराभव केला
- 2014 कोलकाता नाईट रायडर्सनं पंजाब किंग्जचा 3 गडी राखून पराभव केला
- 2015 मुंबई इंडियन्सनं चेन्नई सुपर किंग्जचा 41 धावांनी पराभव केला
- 2016 सनरायझर्स हैदराबादनं रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा 8 धावांनी पराभव केला
- 2017 मुंबई इंडियन्सने रायझिंग पुणे सुपरजायंट्सचा 1 धावेनं पराभव केला
- 2018 चेन्नई सुपर किंग्जनं सनरायझर्स हैदराबादचा 8 विकेट्सने पराभव केला
- 2019 मुंबई इंडियन्सनं चेन्नई सुपर किंग्जचा 1 धावाने पराभव केला
- 2020 मुंबई इंडियन्सनं दिल्ली कॅपिटल्सचा 5 गडी राखून पराभव केला
- 2021 चेन्नई सुपर किंग्जनं कोलकाता नाईट रायडर्सचा 27 धावांनी पराभव केला
- 2022 गुजरात टायटन्सनं राजस्थान रॉयल्सचा सात गडी राखून पराभव केला
- 2023 चेन्नई सुपर किंग्जनं गुजरात टायटन्सचा पाच गडी राखून पराभव केला
हेही वाचा :