ब्रिजटाऊन IND vs AFG T20I : भारतीय संघानं आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील सुपर 8 फेरीत विजयी सुरुवात केली आहे. भारतीय संघानं अफगाणिस्तानवर 47 धावांनी क्रिकेट सामन्यात शानदार विजय मिळवला आहे. भारतानं अफगाणिस्तानला विजयासाठी 182 धावांचं आव्हान दिलं होतं. या धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा संघ 20 ओव्हरमध्ये 134 धावांवर ऑलआऊट झाला.
दोन्ही संघांचा सुपर-8 फेरीतील हा पहिलाच सामना होता. आता भारतीय संघाला बांगलादेशविरुद्ध 22 जूनला आपला पुढचा सामना खेळायचा आहे. हा सामना अँटिग्वा येथं होणार आहे. तर अफगाणिस्तानविरुद्धचा पहिला सामना बार्बाडोसची राजधानी ब्रिजटाऊन येथील केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर झाला.
सूर्याचं सलग दुसरे अर्धशतक, पांड्याही चमकला : या सामन्यात भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली होती. संघानं 11 धावांवर रोहित शर्माच्या (8) रुपानं पहिली विकेट गमावली. यानंतर ऋषभ पंत (20) आणि विराट कोहली (24) यांनी खेळ सावरला. मात्र 19 धावांत 4 गडी गमावल्यानं पुन्हा एकदा संघ अडचणीत दिसत होता. यानंतर सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्यानं 37 चेंडूत 60 धावांची भागीदारी करत डाव सावरला. सूर्यानं 27 चेंडूत सलग दुसरं अर्धशतक झळकावलं. तो 28 चेंडूत 53 धावा करुन बाद झाला. सूर्यानं आपल्या खेळीत 3 षटकार आणि 5 चौकार लगावले. तर पांड्यानं 24 चेंडूत 32 धावा केल्या. त्यानं 2 षटकार आणि 3 चौकार मारले. या खेळीमुळं भारतीय संघानं 8 गडी गमावून 181 धावा केल्या. दुसरीकडे, अफगाणिस्तानसाठी कर्णधार राशिद खान आणि फजलहक फारुकी यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. तर नवीन उल हकला 1 विकेट मिळाली.
अफगाणिस्तानची खराब फलंदाजी : प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा संघ 134 धावांत ऑलआऊट झाला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. अफगाणिस्तानकडून अजमतुल्ला उमरझाईनं सर्वाधिक 26 धावा केल्या. याशिवाय एकाही फलंदाजाला 20 धावांचा आकडा गाठता आला नाही. तर भारतीय संघाकडून बुमराह आणि अर्शदीप सिंगनं 3-3 विकेट घेतल्या. कुलदीप यादवला 2 विकेट मिळाल्या. अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा यांनीही प्रत्येकी 1 विकेट घेतली.
भारताच्या विजयाचे खरे शिल्पकार
- सूर्यकुमार यादव: तीन विकेट्स गमावल्यानंतर भारतीय संघ एकेकाळी संघर्ष करताना दिसत होता. यादरम्यान सूर्यकुमार यादवनं चांगली फलंदाजी केली. त्यानं शिवम दुबे आणि हार्दिक पांड्यासोबत महत्तवपूर्ण भागीदारी केली. सूर्यानंही शानदार अर्धशतक केलं. त्यानं 28 चेंडूत 53 धावा केल्या.
- हार्दिक पंड्या : टीम इंडियानं 90 धावांवर चार विकेट गमावल्या होत्या. यादरम्यान हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यांनी टीम इंडियाचा डाव सांभाळला. दोघांनी 60 धावांची भागीदारी केली. हार्दिक पांड्यानं 32 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिलं.
- अक्षर पटेल : भारताच्या या विजयात अक्षर पटेलचाही महत्त्वाचा वाटा आहे. त्यानं शेवटच्या षटकात वेगवान धावा करत भारताची धावसंख्या 180 च्या पुढे नेली. याशिवाय गोलंदाजीतही त्यानं विकेट घेतल्या. त्यानं एक ओव्हर मेडनही टाकली.
- जसप्रीत बुमराह : सुपर-8 च्या पहिल्याच सामन्यातही बुमराहची जादू पाहायला मिळाली. त्यानं अफगाणिस्तान गुरबाज आणि झाझाई यांना बाद केलं. गुरबाज या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्यानं 3 विकेट घेतल्या.
- अर्शदीप सिंग : भारताच्या विजयात अर्शदीप सिंगचाही मोठा वाटा आहे. त्यानं सामन्याच्या शेवटी राशिद खान आणि नवीन अल हक यांना बाद केलं. त्याच्या शानदार गोलंदाजीमुळं हा सामना लवकर संपवण्यात भारताला यश आलं.
टी-20 मध्ये भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात आमनेसामने
- एकूण टी-20 सामने: 9
- भारतानं जिंकले : 8
- अफगाणिस्ताननं जिंकले : 0
- अनिर्णीत : 1
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन :
- भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग
- अफगाणिस्तान संघ : रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम झदरन, गुलबदिन नायब, अजमतुल्ला उमरझाई, हजरतउल्लाह झझई, नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी, रशीद खान (कर्णधार), नवीन उल हक, नूर अहमद आणि फजलहक फारुकी.
हेही वाचा :