रांची IND vs ENG 4th Test : भारतीय संघानं इंग्लंडविरुद्ध रांची इथल्या कसोटी सामन्यात 5 गडी राखून विजय मिळवलाय. भारतीय संघानं खेळाच्या चौथ्याच दिवशी चहापानापूर्वीच 192 धावांचं लक्ष्य गाठलंय. शुभमन गिल 52 धावा करुन नाबाद राहिला आणि ध्रुव जुरेल 39 धावा करुन नाबाद राहिला. या विजयासह भारतीय संघानं पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 3-1 अशी विजयी आघाडी घेतलीय. मालिकेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना 7 मार्चपासून धरमशाला इथं होणार आहे.
सलग 17 वा मालिका विजय : भारतीय संघाचा घरच्या मैदानावरील हा सलग 17वा मालिका विजय आहे. 2012 मध्ये ॲलिस्टर कुकच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाकडून पराभूत झाल्यानंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर सातत्यानं चांगली कामगिरी करत आहे. त्यानंतर त्यांनी खेळलेल्या 48 कसोटी सामन्यांपैकी 39 सामने जिंकले आहेत. यादरम्यान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडकडून झालेल्या कसोटी सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
रोहित शर्माची अर्धशतकी खेळी : लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी 84 धावांची भागीदारी करुन भारताला चांगली सुरुवात करुन दिली. रविवारी तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दोघांनी मिळून 40 धावा जोडल्या होत्या. त्यानंतर आज रोहित शर्मानं जेम्स अँडरसनच्या चेंडूवर षटकार खेचून भारताची धावसंख्या 50 च्या पुढं नेली. त्यानंतर यशस्वीनंही काही चांगले फटके मारले. भारताला पहिला धक्का यशस्वी जैस्वालच्या रुपात बसला. तो पार्टटाइम फिरकी गोलंदाज जो रुटच्या चेंडूवर जेम्स अँडरसनकडे झेलबाद झाला. यशस्वी बाद झाल्यानंतर काही वेळातच रोहितनं आपलं अर्धशतक पूर्ण केलं. मात्र 55 धावा करुन तो टॉम हार्टलीच्या चेंडूवर झेलबाद झाला. त्यानंतर नवखा रजत पाटीदारही शून्यावर आऊट झाला.
जुरेल-गिलची अभेद्य भागीदारी : उपाहारानंतर शोएब बशीरनं रवींद्र जडेजा आणि सर्फराज खानला लागोपाठच्या चेंडूंवर बाद करत सामना रोमांचक टप्प्यावर नेला. लागोपाठ दोन विकेट गेल्यानं भारतीय संघ बॅकफुटवर गेला. मात्र अशा परिस्थितीत ध्रुव जुरेल आणि शुभमन गिल यांनी चाहत्यांना निराश न करता भारताला संकटातून बाहेर काढलं आणि विजयाकडं नेलं. गिल आणि जुरेल यांनी सहाव्या विकेटसाठी 72 धावांची नाबाद भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला.
हेही वाचा :