राजकोट IND vs ENG 3rd Test 4th Day : भारतानं इंग्लंडचा 434 धावांनी पराभव केला: तिसऱ्या कसोटीत भारतानं इंग्लंडचा 434 धावांनी पराभव केलाय. राजकोटमध्ये झालेल्या या सामन्यात इंग्लंडला 557 धावांचं लक्ष्य मिळालं होतं. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 122 धावांवर गारद झाला. मार्क वुड वगळता इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला 20 चा आकडाही गाठता आला नाही. वुडनं 15 चेंडूत 33 धावा केल्या. त्याचवेळी भारताकडून रवींद्र जडेजानं पाच विकेट घेतल्या. याशिवाय कुलदीपला दोन बळी घेण्यात यश आलं. बुमराह, अश्विनला प्रत्येकी एक विकेट मिळाली. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतानं 2-1 अशी आघाडी घेतली आहे. हैदराबादमधील पहिली कसोटी इंग्लंडनं जिंकली होती, तर विशाखापट्टणममधील दुसरी कसोटी भारतानं जिंकली होती.
इंग्लंडचा डाव 122 धावांवर आटोपला : राजकोटमध्ये नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम फलंदाजी करत 445 धावा केल्या. त्याचवेळी इंग्लंडचा पहिला डाव 319 धावांवर संपला. पहिल्या डावाच्या आधारे भारताकडं दुसऱ्या डावात 126 धावांची आघाडी होती. भारतानं 4 बाद 430 धावा करून दुसरा डाव घोषित केला. एकूण आघाडी 556 धावांची झाली. 557 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव 122 धावांवर आटोपला. मालिकेतील चौथा सामना 23 फेब्रुवारीपासून रांची येथे खेळवला जाणार आहे.
भारताकडं मोठी आघाडी : राजकोट कसोटीत भारतीय संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 445 धावा केल्या होत्या. त्यांनतर प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 319 धावांवरच मर्यादित राहिला. यानंतर तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघानं 2 बाद 196 धावा केल्या होत्या. यानंतर आज सकाळी खेळाला सुरुवात झाल्यानंतर शुभमन गिल आणि कुलदीप यादवनं काही आक्रमक फटके मारत धावगती वाढवली. मात्र 91 धावांवर शुभमन गिल धावबाद धाला. यानंतर काल रिटायर्ड हर्ट झालेला शतकवीर यशस्वी जैस्वाल पुन्हा मैदानात आला. त्यानं लंच ब्रेक नंतर आक्रमक फलंदाजी करत साहेबांच्या गोलंदाजीची अक्षरशः पिसं काढली. तसंच सरफराज खाननही त्याला चांगली साथ देत आक्रमक अर्धशतक झळकावलंय. त्यानंतर जैस्वालनं आपलं दुसरं द्विशतकही पुर्ण केलंय. यानंतर भारतानं आपला डाव घोषित केलाय.
राजकोटवर चौथ्या डावात फलंदाजी करणे अवघड : चौथ्या दिवशी भारतीय संघानं 400 किंवा 450 धावांचं लक्ष्य ठेवलं, तर 'बॅझबॉल'चा खेळ करुनही इंग्लंडला ते साध्य करणं सोपं जाणार नाही. याचं कारण म्हणजे येथील टर्निंग पिच आहे. कारण राजकोटची खेळपट्टी चौथ्या आणि पाचव्या दिवशी फिरकीपटूंना खूप मदत करते. अशा स्थितीत रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव या भारतीय फिरकी गोलंदाजांसमोर हे लक्ष्य गाठणं इंग्लंडसाठी सोपं जाणार नाही. याशिवाय भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजही उत्कृष्ट फॉर्मात आहेत. सिराजनं पहिल्या डावात 4 बळी घेतले आहेत.
आठ वर्षांपूर्वी इंग्लंडनं दिलं होतं 310 धावांचं लक्ष्य : आत्तापर्यंत राजकोटच्या मैदानावर फक्त 2 कसोटी सामने झाले आहेत. हा तिसरा सामना खेळला जात आहे. यापूर्वी नोव्हेंबर 2016 मध्ये इंग्लंडविरुद्धचा कसोटी सामना अनिर्णित राहिला होता. तो सामना मोठ्या धावसंख्येचा होता. ज्यात इंग्लंडनं पहिल्या डावात 537 धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या डावात 3 बाद 260 धावा करुन डाव घोषित करण्यात आला होता. तर भारतीय संघानं पहिल्या डावात 488 धावा केल्या होत्या. त्या सामन्यात इंग्लंडनं भारताला 310 धावांचं लक्ष्य दिलं होतं. प्रत्युत्तरात भारतीय संघाला चौथ्या डावात 6 गडी गमावून 172 धावा करता आल्या आणि हा सामना अनिर्णित राहिला होता.
वेस्ट इंडिजचा डावाच्या फरकानं पराभव : इंग्लंडनंतर या मैदानावर भारतीय संघाचा सामना वेस्ट इंडिजशी झाला. ऑक्टोबर 2018 मध्ये झालेल्या त्या सामन्यात भारतीय संघानं कॅरेबियन संघाचा एक डाव आणि 272 धावांच्या फरकानं पराभव केला होता. या सामन्यात भारतीय संघानं पहिल्या डावात 9 विकेट्सवर 649 धावा करत पहिला डाव घोषित केला. यानंतर वेस्ट इंडिजचा संघ पहिल्या डावात 181 धावा करू शकला होता. त्यानंतर फॉलोऑनमध्ये खेळताना कॅरेबियन संघ दुसऱ्या डावात 196 धावांवरच मर्यादित राहिला आणि त्यांनी सामना गमावला. त्या सामन्यात भारताकडून सामनावीर पृथ्वी शॉनं 134 धावा, विराट कोहलीनं 139 धावा आणि रवींद्र जडेजानं नाबाद 100 धावा केल्या होत्या.
हेही वाचा :