विशाखापट्टणम Ind Vs Eng Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात विशाखापट्टणम येथील डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी क्रिकेट स्टेडियमवर दुसरा कसोटी सामना सुरू आहे. आज (3 फेब्रुवारी) सामन्याचा दुसरा दिवस आहे. दिवसाच्या पहिल्या तासातच युवा सलामीवीर यशस्वी जयस्वालनं आपलं द्विशतक साजरं केलं. जयस्वालनं अवघ्या 277 चेंडूत चौकार मारून द्विशतक पूर्ण केलं. विशेष म्हणजे, त्यानं षटकार ठोकत आपलं शतक पूर्ण केलं होतं. कसोटीत द्विशतक करणारा तो तिसरा सर्वात तरुण भारतीय बनला आहे.
भारताकडून कसोटीत 200 धावा करणारे सर्वात तरुण खेळाडू
- विनोद कांबळी - 224 विरुद्ध इंग्लंड, मुंबई 1993 - 21 वर्ष 35 दिवस
- विनोद कांबळी - 227 विरुद्ध झिम्बाब्वे, दिल्ली 1993 - 21 वर्ष 55 दिवस
- सुनील गावसकर - 220 विरुद्ध वेस्ट इंडिज, पोर्ट ऑफ स्पेन 1971 - 21 वर्षे 283 दिवस
- यशस्वी जयस्वाल - 209 विरुद्ध इंग्लंड, विशाखापट्टणम 2024 - 22 वर्षे 37 दिवस
पहिलं द्विशतक : यशस्वीचं कसोटी कारकिर्दीतील हे पहिलं द्विशतक आहे. या आधी त्यानं गेल्या वर्षी वेस्ट इंडिजविरुद्ध 171 धावा केल्या होत्या. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारतानं पहिल्या डावात 6 बाद 336 धावा केल्या होत्या. यशस्वी जयस्वाल 179 धावा तर रविचंद्रन अश्विन 5 धावा करून नाबाद होते. यशस्वीशिवाय इतर एकाही फलंदाजाला पहिल्या दिवशी 35 धावांचा टप्पा गाठता आला नाही. पहिल्या दिवशी इंग्लंडकडून शोएब बशीर आणि रेहान अहमद यांनी सर्वाधिक 2-2 विकेट घेतल्या.
भारताची प्रथम फलंदाजी : या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतानं कुलदीप यादव, रजत पाटीदार आणि मुकेश कुमार यांचा प्लेइंग 11 मध्ये समावेश केलाय. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 25 जानेवारीपासून हैदराबादमध्ये खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाला चौथ्या दिवशीच 28 धावांनी पराभवाला सामोरं जावं लागलं.
हे वाचलंत का :