विशाखापट्टणम IND vs ENG 2nd Test : विशाखापट्टणम इथं सुरू असलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव 253 धावांवर आटोपलाय. त्यामुळं भारतीय संघाला 143 धावांची आघाडी मिळालीय. यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाच्या सलामीवीरांनी 5 षटकांत बिनबाद 28 धावा केल्या. यामुळं दिवसअखेर भारत 171 धावांनी आघाडीवर आहे. तत्पुर्वी जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीसमोर इंग्लिश फलंदाज हतबल आणि असहाय्य झाल्याचं दिसत होतं. जसप्रीत बुमराहनं इंग्लंडच्या 6 फलंदाजांना बाद केलंय. याशिवाय कुलदीप यादवनंही 3 बळी घेतले. तर अक्षर पटेलला 1 बळी मिळाला.
-
Stumps on Day 2 in Vizag! 🏟️
— BCCI (@BCCI) February 3, 2024
A fabulous day with the bat & ball 🙌#TeamIndia will resume Day 3 with a lead of 171 runs in the second innings 👌👌
Scorecard ▶️ https://t.co/X85JZGt0EV#INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/c3mVHem1Ty
बुमराहसमोर इंग्लिश फलंदाजांनी टेकले गुडघे : आज दुसऱ्या दिवशी भारतानं युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालच्या द्विशतकाच्या जोरावर भारतानं 396 धावा केल्या. यानंतर प्रत्युत्तरात फलंदाजीला आलेल्या इंग्लंडची सुरुवात चांगली झाली. इंग्लंडचे सलामीवीर बेन डकेट आणि झॅक क्रॉलीनं पहिल्या विकेटसाठी 59 धावांची भागीदारी केली. यानंतर बेन डकेट 21 धावा करुन बाद झाला. यानंतर 114 धावांवर साहेबांना दुसरा धक्का बसला. झॅक क्रॉली 76 धावा करुन अक्षर पटेलचा बळी ठरला. यानंतर ठराविक अंतरानं इंग्लंडटचे फलंदाज बाद होत राहिले.
झॅक क्रॉलीची शानदार खेळी : इंग्लंडकडून सलामीवीर झॅक क्रॉलीनं सर्वाधिक 76 धावा केल्या. यानंतर इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्सनं 47 धावांची खेळी केली. मात्र उर्वरित फलंदाजांनी घोर निराशा केली. इंग्लिश फलंदाज ठराविक अंतरानं बाद होत राहिले. ओली पोप, जॉनी बेअरस्टो आणि बेन फॉक्ससारखे फलंदाज स्वस्तात बाद झाले.
दुसऱ्या डावात भारताची सावध सुरुवात : इंग्लंडचा पहिला डाव 253 धावांवर संपुष्टात आल्यानंतर दुसऱ्या डावात फंलदाजीसाठी आलेल्या भारतीय संघानं सावध सुरुवात केली. सलामीवीर रोहित शर्मा (13) आणि यशस्वी जैस्वाल (15) यांनी 5 षटकांत 28 धावा केल्या. आज दिवसअखेर भारताकडं 171 धावांची आघाडी असून अद्याप 10 विकेट शिल्लक आहेत.
भारताच्या पहिल्या डावात 396 धावा : याआधी भारतीय कर्णधार रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघानं 396 धावा केल्या. भारताकडून सलामीवीर यशस्वी जैस्वालनं सर्वाधिक 209 धावा केल्या. मात्र, याशिवाय भारताच्या एकाही फलंदाजाला पन्नास धावांचा टप्पा गाठता आला नाही. इंग्लंडकडून जेम्स अँडरसन, शोएब बशीर आणि रिहान अहमद यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले. तर टॉम हार्टलीला 1 बळी घेण्यात यश आलं.
हेही वाचा :