हैदराबाद Ind Vs Eng : इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाला 28 धावांनी पराभव पत्कारावा लागला. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताला चौथ्या डावात विजयासाठी 231 धावा करायच्या होत्या. परंतु भारताचा संपूर्ण संघ केवळ 202 धावांवरच गारद झाला. या विजयासह इंग्लंडनं पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. उभय संघांमधील दुसरा कसोटी सामना 2 फेब्रुवारीपासून विशाखापट्टणम येथे खेळला जाईल.
भारतीय संघ 202 धावांवर गडगडला : सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडचा संघ 246 धावांवर ऑलआऊट झाला. यानंतर भारतानं पहिल्या डावात 436 धावा करत इंग्लंडवर 190 धावांची आघाडी घेतली. मात्र दुसऱ्या डावात इंग्लंडनं ऑली पॉपच्या 278 चेंडूत 195 धावांच्या उत्कृष्ट शतकाच्या जोरावर 420 धावा केल्या आणि भारताला विजयासाठी 231 धावांचं लक्ष्य दिलं. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ दुसऱ्या डावात 202 धावांवर गडगडला. भारताकडून एकाही फलंदाजाला अर्धशतक झळकावता आलं नाही. इंग्लंडकडून दुसऱ्या डावात टॉम हार्टलेनं सर्वाधिक 7 बळी घेतले.
इंग्लंडच्या फिरकीपटूंची जादू : दुसऱ्या डावात भारतीय संघाची सुरुवात दमदार झाली. शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी मिळून पहिल्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी केली. मात्र हार्टलेनं गिल, रोहित आणि अक्षर पटेल यांना बाद करत सामन्यावर पकड मजबूत केली. केएल राहुल जो रूटचा बळी ठरला. तर रवींद्र जडेजाला बेन स्टोक्सनं धावबाद केलं. श्रेयस अय्यरकडून खूप अपेक्षा होत्या, मात्र तो लीचच्या फिरकीत अडकला.
टॉम हार्टलेचे 7 बळी : दुसऱ्या डावात एकवेळ भारताची अवस्था 119 धावांत 7 गडी बाद अशी दयनीय झाली होती. त्यानंतर केएस भरत आणि आर अश्विन यांच्यामध्ये 57 धावांची भागीदारी झाली. हे दोन्ही खेळाडू भारताला विजयाच्या समीप आणतील असं वाटत होतं. मात्र टॉम हार्टलेनं दोघांना पॅव्हेलियनमध्ये पाठवून भारताच्या आशा धुळीस मिळवल्या. यानंतर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी मिळून 25 धावांची भागीदारी करत सामना रोमांचक अवस्थेत. सामना पाचव्या दिवशी जाईल असं वाटत असताना, चौथ्या दिवसाच्या शेवटच्या षटकात हार्टलेनं सिराजला बाद करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला.
हे वाचलंत का :