चेन्नई IND vs BAN 1st test : भारत आणि बांगलादेश क्रिकेट संघ यांच्यातील दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना गुरुवार, 19 सप्टेंबर 2024 रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर सुरु होत आहे. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विन सारखे भारतीय खेळाडू या मालिकेत अनेक विक्रम मोडू शकतात, तर भारतीय संघ आपल्या घरच्या मैदानावर मालिका विजयाचा विक्रम 18 वर नेईल.
कोणते विक्रम या मालिकेत माडू शकतात :
घरच्या मैदानावर सर्वाधिक सलग कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम :
जर भारतानं ही मालिका जिंकली किंवा बरोबरी साधली तर भारताचा मालिका विजयाची संख्या 18 पर्यंत जाईल, भारतीय संघानं डिसेंबर 2012 पासून घरच्या मैदानावर एकही मालिका गमावलेली नाही. इंग्लंडविरुद्ध 2012 मध्ये 2-1 नं पराभूत झाले होते.
रोहित शर्मा :
रोहितला मालिकेदरम्यान दोन विक्रम करण्याची संधी असेल. या फलंदाजानं कसोटीत आणखी आठ षटकार मारले तर तो सर्वाधिक षटकार मारणारा भारताचा कसोटी फलंदाज बनू शकतो. तो सध्या 84 षटकारांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग 91 कसोटी षटकारांसह अव्वल स्थानावर आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स (131), न्यूझीलंडचा माजी यष्टिरक्षक-फलंदाज ब्रेंडन मॅक्युलम (107) आणि ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक-फलंदाज ॲडम गिलख्रिस्ट (100) हे जगातील टॉप तीन सिक्स हिटर्समध्ये आहेत. 37 वर्षीय रोहितनं या दोन सामन्यांमध्ये सलग षटकार मारले तर तो कसोटीत 100 षटकार मारणारा चौथा आणि पहिला भारतीय फलंदाज बनू शकतो.
याशिवाय 'हिटमॅन' रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 शतकं पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे. रोहितनं 483 सामन्यात 48 शतकं झळकावली आहेत. 50 आंतरराष्ट्रीय शतकं पूर्ण करण्यापासून तो केवळ दोन शतकं दूर आहे, असं करणारा तो तिसरा भारतीय फलंदाज आणि एकूण 10 वा खेळाडू ठरेल. त्याच्या आधी, फक्त सचिन तेंडुलकर (100 शतकं) आणि विराट कोहली (80 शतकं) हे दोन भारतीय आहेत, ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 शतकं झळकावली आहेत.
रविचंद्रन अश्विन :
रविचंद्रन अश्विन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठी कामगिरी करण्याच्या मार्गावर आहे. आर अश्विनच्या नावावर भारताकडून 183 डावात 455 विकेट्स आहेत. मायदेशात खेळल्या गेलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा अनिल कुंबळेचा (204 डावांत 476) विक्रम मोडण्यापासून अश्विन फक्त 22 विकेट्स दूर आहे.
विराट कोहली :
विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरचा सर्वात मोठा विक्रम मोडण्यास उत्सूक आहे. कारण त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 27 हजार धावा करणारा खेळाडू बनण्यासाठी फक्त 58 धावांची गरज आहे. विराट 623 डावांमध्ये 27,000 धावा करण्याचा सचिनचा विक्रम मोडू शकतो. सध्या कोहलीनं 591 डावात 26942 धावा केल्या आहेत.
दरम्यान, माजी भारतीय कर्णधाराला मायदेशात 12 हजार आंतरराष्ट्रीय धावा करण्यासाठी फक्त 11 धावांची गरज आहे आणि तो सर्व फॉरमॅटमध्ये फक्त पाचवा खेळाडू आणि असं करणारा एकमेव सक्रिय खेळाडू बनेल. या मालिकेदरम्यान कोहलीची नजर 9 हजार धावा पूर्ण करण्यावर असेल. आतापर्यंत त्यानं कसोटी क्रिकेटमध्ये 8848 धावा केल्या असून हा आकडा गाठण्यासाठी त्याला फक्त 152 धावांची गरज आहे. असं केल्यास या फॉरमॅटमध्ये इतक्या धावा करणारा तो चौथा भारतीय ठरेल.
हेही वाचा :