चेन्नई IND vs BAN 1st Test Day 4 : भारत आणि बांगलादेश क्रिकेय संघ यांच्यातील चेन्नई कसोटी सामन्यात तीन दिवसांचा खेळ पूर्ण झाला आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळही भारतीय संघासाठी यशस्वी ठरला आणि आता ते विजयाच्या अगदी जवळ आहेत. अशा स्थितीत या सामन्यासाठी आजचा म्हणजेच चौथ्या दिवसाचा खेळ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. खेळाच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाकडून अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळाली, ज्यात ऋषभ पंत आणि शुभमन गिल यांच्या शतकांचा समावेश होता. यानंतर गोलंदाजांनी बांगलादेशी फलंदाजांनाही अडचणीत आणलं आणि तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत चार बळी मिळवून दिले.
भारतीय संघानं दिलं 515 धावांचं लक्ष्य : सामन्याच्या तिसऱ्या दिवशी तीन गड्यांच्या मोबदल्यात 81 धावांनी पुढं खेळणाऱ्या भारतीय संघानं चार विकेट्सवर 287 धावांवर डाव घोषित केला. ऋषभ पंत आणि शुभमन गिल यांच्याकडून मोठी खेळी पाहायला मिळाली. पंतनं 13 चौकार आणि चार षटकारांसह 109 धावा केल्या. तर शुभमन गिलनं नाबाद 119 धावा केल्या. गिलनं 176 चेंडूंच्या खेळीत दहा चौकार आणि चार षटकार मारले. या दोघांनीही चौथ्या विकेटसाठी 167 धावांची भागीदारी केली, ज्यामुळं भारतानं दुसऱ्या डावात चार विकेट गमावत 287 धावा केल्या आणि 514 धावांची आघाडी होताच डाव घोषित केला.
भारतीय संघ विजयापासून 6 विकेट दूर : 515 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशनं दुसऱ्या डावात चार गड्यांच्या मोबदल्यात 158 धावा केल्या होत्या. मात्र खराब प्रकाशामुळं खेळ दुपारी 4.25 वाजता थांबवावा लागला. बांगलादेशला पराभव टाळण्यासाठी अद्याप 357 धावा करायच्या आहेत आणि पूर्ण दोन दिवसांचा खेळ बाकी आहे. त्याचबरोबर भारतीय संघ आता विजयापासून फक्त 6 विकेट दूर आहे.
ठरणार मोठा विक्रम : यासह भारतानं बांगलादेशविरुद्धचा पहिला कसोटी सामना जिंकताच हा मोठा विक्रम ठरेल. 1932 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून भारतानं एकूण 579 सामने खेळले असून हा त्यांचा 580वा कसोटी सामना होता. यात भारतानं 178 सामने जिंकले तर 178 सामने हरले. उर्वरित 223 सामन्यांपैकी 222 सामने अनिर्णित राहिले आणि एक सामना रद्द झाला.
विक्रमी कामगिरी करणारा पाचवा संघ ठरणार : चेन्नई इथं सुरु असलेला बांगलादेशविरुद्धचा पहिला कसोटी सामना जिंकताच भारत कसोटी क्रिकेटमध्ये पराभवापेक्षा जास्त विजय नोंदवणारा पाचवा संघ ठरेल. भारताला आतापर्यंत या विक्रमाला स्पर्श करता आला नव्हता. हा टप्पा गाठल्यानं 1932 नंतर म्हणजे 92 वर्षांनंतर पहिल्यांदाच भारतीय संघानं कसोटीत पराभवापेक्षा जास्त सामने जिंकेल. सध्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात केवळ चार संघांनी पराभवापेक्षा जास्त विजय मिळवले आहेत.
जे संघ कसोटीत पराभूत होण्यापेक्षा जास्त सामने जिंकले :
- ऑस्ट्रेलियानं 866 कसोटी सामने खेळले आहेत, त्यात 414 जिंकले आहेत आणि 232 गमावले, ते पहिल्या स्थानावर आहेत.
- इंग्लंडनं 1077 कसोटी सामने खेळले त्यात 397 विजय आणि 325 पराभवांसह ते दुसऱ्या स्थानावर आहे.
- दक्षिण आफ्रिकेनं 466 कसोटी सामने खेळले आहेत, यात 179 सामने जिंकले आहेत आणि 161 सामने गमावले, ते तिसऱ्या स्थानावर आहेत.
- पाकिस्ताननं 458 कसोटी सामन्यांपैकी 148 जिंकले आहेत आणि 144 गमावले आहेत. ते सध्या चौथ्या स्थानावर आहेत.
हेही वाचा :