पुणे Woman Ultimate Fighter Champion : 'अल्टिमेट फाइटिंग चॅम्पियन' होणारी पहिली भारतीय महिला म्हणून पूजा तोमर हिनं यश मिळवलं. मात्र चॅम्पियन झाल्यावरही भारतात परतल्यावर ना सरकार, ना नागरिकांकडून तिची कोणतीही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे पूजा तोमर हिनं खंत व्यक्त केली. "एकीकडं क्रिकेटला मोठं महत्व दिलं जात आहे. दुसरीकडं भारतात अनेक खेळ असून या खेळांमध्ये देखील सरकारनं लक्ष घालावं. आमच्या सारख्या महिलांना प्रोत्साहन द्यावं," अशी खंत पूजा तोमर हिनं व्यक्त केली.
'अल्टिमेट फाइटिंग चॅम्पियन' होणारी पहिली भारतीय महिला :'अल्टिमेट फाइटिंग चॅम्पियन' होणारी पहिली भारतीय महिला पूजा तोमर आता अष्टकोन रिंगमध्ये आणि रिंगबाहेरही अतुलनीय प्रवास करण्यासाठी सज्ज झाली आहे. तिच्या कामगिरीमुळे युवा पिढीला प्रेरणा मिळणार आहे. या वर्षाच्या सुरुवातीला लुईव्हिल (अमेरिका) इथं अल्टिमेट फाइटिंग चॅम्पियनशिप (UFC) मध्ये मिक्स्ड मार्शल आर्ट्स (MMA) फायटर पूजा तोमर हिनं विजेतेपद पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. हे यश मिळवून पूजा तोमर अल्टिमेट फाइटिंग चॅम्पियन' होणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. तिनं यूएफसी (UFC) मधील तिचे अनुभव सांगताना फिटर (FITTR) या आघाडीच्या ऑनलाइन फिटनेस आणि न्यूट्रिशन प्लॅटफॉर्मचे आभार देखील मानले. या संस्थेनं तिला UFC गौरवाचं स्वप्न साकार करण्यात मदत केली.
आव्हानात्मक प्रवास : पूजा तोमर यावेळी म्हणाली की, “यूएफसीमधील माझा प्रवास आनंददायी आणि आव्हानात्मक होता. मला आशा आहे की माझी कथा इतरांना मिश्र मार्शल आर्ट्सच्या जगात त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यास प्रेरित करेल. या खेळात भारताला जागतिक स्तरावर खेळाडूंची गरज असून यामुळे तरुणींना मार्शल आर्ट देखील शिकता येणार आहे. तसेच त्यांना असणारी भीती ती देखील जाईल. नक्कीच माझा विजय अधिकाधिक तरुणांना आणि त्यांच्या पालकांना या खेळाला करिअर म्हणून स्वीकारण्याची प्रेरणा देणार आहे. पण एक खंत अशी की जेव्हा मी चॅम्पियन झाली, तेव्हा तिथं 50 हजार लोकांकडून माझं स्वागत झालं की भारतातील मुलगी येऊन अश्या खेळात आपलं नाव करत आहे. मला वाटलं होतं की भारतात गेल्यावर मोठा सन्मान होईल. लोक आपल्याला विचारतील, सरकारकडून वर्ल्ड चॅम्पियनबाबत मदत होईल. पण असं न होता, कोणीच विचारत नाहीये. माझी अशी अपेक्षा आहे की अश्या खेळाला देखील आज सपोर्ट केला पाहिजे."
भारतीय खेळाडूंसाठी जागतिक स्तरावर महत्त्वाचा टप्पा : “पूजा तोमरचं विजेतेपद जागतिक स्तरावर भारतीय खेळाडूंसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. तिचं समर्पण, चिकाटी आणि अपवादात्मक प्रतिभेनं भारतातील अनेक तरुण लढवय्यांसाठी मार्ग मोकळा केला आहे”, असं फिटर (FITTR) चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र चोक्सी यांनी यावेळी सांगितलं.