नवी दिल्ली Playing 11 Announced : इंग्लंड क्रिकेट संघाला पाकिस्तानविरुद्ध तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. आता इंग्लंडनं मुलतान इथं 7 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या कसोटीसाठी आपली प्लेइंग 11 जाहीर केली आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स दुखापतीमुळं पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाही. त्याच्या जागी ओली पोप पहिल्या कसोटीत कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारणार आहे. विशेष म्हणजे सामन्याच्या दोन दिवस आधीच इंग्लंड संघानं आपला अंतिम संघ जाहीर केला आहे.
We have announced our XI for the first Test against Pakistan in Multan 📝
— England Cricket (@englandcricket) October 5, 2024
🇵🇰 #PAKvENG 🏴 | #EnglandCricket 🦁
ब्रेडन कार्सला पदार्पणाची संधी : डरहमचा वेगवान गोलंदाज ब्रेडेन कार्स पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे. तसंच सॉमरसेटचा फिरकीपटू जॅक लीच जानेवारीत भारत दौऱ्यानंतर प्रथमच कसोटी संघात परतत आहे. इंग्लंड संघाला त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. सलामीवीर फलंदाज जॅक क्राऊली बोटाच्या दुखापतीतून पूर्णपणे बरा झाला असून तोही प्लेइंग इलेव्हनमध्ये परतला आहे.
फलंदाजीची जबाबदारी कोणावर : पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात फलंदाजीची जबाबदारी जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रुट आणि हॅरी ब्रूक यांच्यावर असेल. डकेट आणि ब्रूक गेल्या काही काळापासून उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत आणि त्यांनी दोघांनी इंग्लंड संघाला अनेक सामने जिंकण्यास मदत केली आहे. जो रुटचा पाकिस्तानमधील अनुभव इंग्लंडला उपयोगी पडणार असून तो पुन्हा एकदा मोठी खेळी खेळण्यास उत्सुक असेल.
इंग्लंडनं जिंकले अधिक कसोटी सामने : पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत एकूण 88 कसोटी सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी इंग्लंडनं 28 जिंकले आहेत आणि पाकिस्तानी संघ 21 जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. तर 39 कसोटी सामने अनिर्णित राहिले.
पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन :
जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप (कर्णधार), जो रुट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ (यष्टिरक्षक), ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, ब्रायडन कार्स, जॅक लीच, शोएब बशीर
हेही वाचा :