नवी दिल्ली AFG vs NZ Only Test : अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील एकमेव कसोटी सामना 9 सप्टेंबरपासून ग्रेटर नोएडा इथं खेळवला जाणार होता. पण पाऊस, ओलं मैदान आणि खराब व्यवस्थेमुळं सामन्यातील चारही दिवस एकही चेंडू टाकता आला नाही. इतकंच काय तर सामन्याच्या चार दिवसांत नाणेफेकही होऊ शकली नाही.
Day 1 - Called Off.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 12, 2024
Day 2 - Called Off.
Day 3 - Called Off.
Day 4 - Called Off.
- The story of the Afghanistan Vs New Zealand Test match in Noida. pic.twitter.com/Nwtq6KigHL
आतापर्यंत सात सामने रद्द : आता हा सामना रद्द होण्याचा धोका आहे. एकही चेंडू टाकल्याशिवाय हा सामना रद्द झाला तर या सामन्याचं नाव इतिहासात नोंदवलं जाईल. क्रिकेट इतिहासातील हा आठवा कसोटी सामना असेल जो कोणताही चेंडू टाकल्याशिवाय रद्द होईल. याआधी एकही चेंडू टाकल्याशिवाय 7 सामने रद्द झाले आहेत. असं पहिल्यांदा 1890 मध्ये घडलं, जेव्हा ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील ओल्ड ट्रॅफर्ड कसोटी सामना रद्द करण्यात आला. त्याचप्रमाणे 1998 मध्ये शेवटचा आणि 7 वा कसोटी सामना रद्द करण्यात आला होता.
क्रिकेटच्या इतिहासातील हे 7 सामने एकही चेंडू टाकल्याशिवाय झाले रद्द :
- पहिल्यांदा 1890 मध्ये असं घडलं, जेव्हा ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामना रद्द करण्यात आला. हा सामना ओल्ड ट्रॅफर्ड इथं होणार होता. मात्र, सततच्या पावसामुळं सामना होऊ शकला नाही आणि एकही चेंडू टाकल्याशिवाय सामना रद्द करावा लागला. उभय संघांमधला हा तिसरा कसोटी सामना होता.
- अशी वेळ 1938 मध्ये आली, जेव्हा ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील तिसरा कसोटी सामना मँचेस्टर इथं होणार होता. मात्र हा सामनाही पावसाचा बळी ठरला. हा सामना एकही चेंडू न टाकता रद्द करावा लागला.
- यानंतर 1970-71 च्या ऍशेस मालिकेदरम्यान, एकही चेंडू टाकल्याशिवाय सामना सोडून द्यावा लागला. यादरम्यान मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात मालिकेतील तिसरा सामना होणार होता. मात्र मुसळधार पावसामुळं पाचही दिवस खेळ होऊ शकला नाही. पावसाशिवाय अन्य कारणांमुळंही सामना रद्द करावा लागला.
- पाकिस्तान संघानं फेब्रुवारी 1989 मध्ये न्यूझीलंडचा दौरा केला होता. या मालिकेतील पहिली कसोटी 3 फेब्रुवारीपासून ड्युनेडिनमध्ये होणार होती. पण इथंही पाऊस खलनायक ठरला. पहिल्या तीन दिवसांचा खेळ पावसानं वाहून गेल्यानंतर एकही चेंडू टाकल्याशिवाय सामना रद्द करण्यात आला. सामन्यात नाणेफेकही झाली नाही.
- मार्च 1990 मध्ये वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात मालिका होती. दरम्यान, मालिकेतील दुसरा कसोटी सामना गयानाच्या जॉर्जटाउनमध्ये खेळवला जाणार होता. मात्र हा सामनाही इंद्रदेवाच्या रोषाला बळी पडला. पावसामुळं हा सामना रद्द करावा लागला. या सामन्यात नाणेफेकही होऊ शकली नाही.
- 1998 मध्ये झिम्बाब्वेचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर आला होता. त्यानंतर 17 डिसेंबरपासून फैसलाबादमध्ये मालिकेतील तिसरा कसोटी सामना खेळवला जाणार होता, मात्र सलग पाच दिवस इतका पाऊस पडला की एकही चेंडू न टाकता हा सामना रद्द करावा लागला.
- 1998 मध्ये भारतीय संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर गेला होता. त्यादरम्यान, मालिकेची सुरुवात 18 डिसेंबर रोजी ड्युनेडिन कसोटीनं होणार होती. परंतु, पावसानं संपूर्ण खेळ खराब केला. सततच्या पावसामुळं पहिले तीन दिवस खेळ होऊ शकला नाही. यानंतर हा सामनाही नाणेफेक न होता रद्द करण्यात आला. कसोटी क्रिकेटमधला हा शेवटचा सामना होता, जो एकही चेंडू टाकल्याशिवाय सोडून द्यावा लागला.
हेही वाचा :