नाशिक Hanuman Jayanti 2024 : बजरंगबली हनुमंतांची सद्गुरु वेणाभारती महाराज स्थापित कपिकुल सिद्धपीठ या ठिकाणी रामायण कालीन पुरातन अशी स्वयंभू गरुड हनुमानाची मूर्ती आहे. ही देशातील एकमेव हनुमानाची गरुड रुपात मूर्ती असल्याचा दावा करण्यात आला आहे. आज हनुमान जयंतीनिमित्त कपिकुल सिद्धपीठ इथं भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.
कपिकुल सिद्धपीठात गरुड हनुमानाची मूर्ती : हनुमंत म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येतात ते छाती फाडून राम-लक्ष्मण-सीता दर्शविणारी बाहुबली बजरंगबलीची मूर्ती. हातात गदा घेऊन उभे असलेले बजरंगबली हनुमान, ध्यान करणारे हनुमान. परंतु कधी गरुड हनुमानाची मूर्ती पाहिलीय? नाशिकला कपालेश्वर मंदिरामागं मुठे गल्लीमध्ये कपिकुल सिद्धपीठात हनुमानाची मूर्ती विराजमान आहे. विशेष म्हणजे ही मूर्ती अत्यंत दुर्मिळ असून देशात कुठंही अशी मूर्ती पाहायला मिळत नाही, असा दावा या पिठाकडून केला जातो.
गरुड हनुमानाची 800 वर्ष जुनी मूर्ती : श्री गरुड आणि हनुमान एकाच मूर्तीत असलेलं हे हनुमंताचं दुर्मिळ रूप आहे. ही मूर्ती 700 ते 800 वर्षांपूर्वीची असून वालुकामय वज्रलेप करून अधिक सुबक सुंदर आणि भक्कम करुन घेण्यात आली आहे. बजरंबली हनुमंताच्या खांद्यावर गरुडाचे पंख असून पाठीवर पुच्छ आली आहे. नाक गरुडाचे आणि मुख हनुमंताचे आहे, मस्तकी तपस्वी सारख्या शिखा आहेत. हातामध्ये गदा नसून कमळाचे फुल आहे. विठ्ठलाच्या प्राचीन आरतीत "गरुड हनुमंत पुढं उभे राहती" असा उल्लेख आढळतो, त्याप्रमाणं गरुड हनुमान इथं उभे आहेत. या अतिजीर्ण मंदिराचा आणि समाधीचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे.
पूजा करायचे समाधान : या दुर्मिळ हनुमान स्वरूपाची नित्य सेवा पूजा करण्याचं भाग्य आम्हास लाभले, यासाठी आम्ही परमेश्वराचे कृतज्ञ आहोत. जगामध्ये पुराणात प्रसिद्ध हनुमान आणि समाधीची पूजा श्री गुरूंच्या कृपेमुळे करायला मिळते, याच समाधान आहे, असं कपिकुल सिद्धपीठच्या उत्तराधिकारी यांनी सांगितलं.
हनुमंतांना वेगवेगळ्या ज्यूसचा नैवेद्य : सदगुरु वेणाभारती महाराज स्थापित पंचवटीतील श्री कपिकुल सिद्धपीठम, पंचवटी येथे हनुमंत जयंती उत्सव यंदाही मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये तापमानाचा पारा 40 अंशावर गेल्यानं भगवतांना देखील थंडावा मिळावा, यासाठी हनुमतांला कोकम सरबत, कैरी पन्हे, रोझ सरबत, मँगो ज्युस, मिल्क शेक नैवैद्य अर्पण केले गेलेत. कपिकुल येथे 1008 श्री महंत तपोमूर्ती सद्गुरु वेणाभारती महाराज आणि उत्तराधिकारी श्री कृष्णमयी यांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा करण्यात येत आहे. हनुमान जन्मोत्सव सोहळ्याचे औचित्य साधत पहाटे 6 वाजता श्री हनुमंतांसमोर साधना, मानसपूजा करण्यात आली. याच बरोबर 13 कोटी नामजप होणार आहे. तसेच श्री हनुमंतांना आंब्याचा अभिषेक तसेच भीमरूपी स्तोत्राचे अकरा आवर्तने, मनाचे श्लोक पठण आणि भजन सेवा देखील होणार आहे. तसेच सायंकाळी विष्णूमयी कला मंचातर्फे 'जय बोला हनुमान की' या सुरेल भजनांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे.
हेही वाचा :