मुंबई South Mumbai Lok Sabha Constituency : मंगळवारी (30 एप्रिल) सकाळी शिंदे गटाकडून उत्तर-पश्चिम लोकसभा मतदार संघातून रवींद्र वायकर यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाची देखील उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या जागेसाठी शिंदे गटाकडून यामिनी जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळं आता या ठिकाणी महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे अरविंद सावंत विरुद्ध महायुतीकडून शिंदे गटाच्या यामिनी जाधव असा सामना रंगणार आहे.
चुरशीची लढत पाहायला मिळणार : दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. याचं कारण म्हणजे मागील दहा वर्षांपासून (2014 ते 2024) येथे शिवसेनेचे अरविंद सावंत हे खासदार आहेत. त्यांनी 2014 साली आता शिंदे गटात असणारे आणि पूर्वी काँग्रेसमध्ये असणारे मिलिंद देवरा यांचा पराभव केला होता. तर 2019 साली देखील अरविंद सावंत हे मोठ्या मताधिक्क्यानं विजयी झाले होते. त्यामुळं आता येथे शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढाई पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी मराठी बहुल वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. तसंच गुजराती, जैन आदी समाजातील बांधवही इथं मोठ्या प्रमाणात राहतात. त्यामुळं नेमका विजय कोणाचा होतो? विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडते? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. यामुळं ही लढत अत्यंत चुरशीची होणार असल्याचं बोललं जातय.
ठाणे, नाशिकचा तिढाही लवकरच सुटणार : आज दिवसभरात शिंदे गटाकडून दोन उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली. सकाळी उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात रवींद्र वायकर यांचं नाव जाहीर करण्यात आलं. तर त्यानंतर आता दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून यामिनी जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामिनी जाधव या माजी स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या पत्नी आहेत. आज दोन उमेदवारांची नावं जाहीर झाली असली तरी महायुतीतील काही जागांचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. यामध्ये ठाणे आणि नाशिक या जागांचा समावेश आहे. ठाण्याच्या जागेवर भाजपानं दावा केल्यामुळं इथला प्रश्न सुटत नाहीये. परंतु, आता या दोन्ही जागेवरील तिढा लवकरच सुटेल, असं शिंदे गटाकडून सांगण्यात येतय.
हेही वाचा -
- शिंदे गटात लेट एन्ट्री घेणाऱ्या रवींद्र वायकर यांना लोकसभा उमेदवारी, 'या' मतदारसंघातून लढणार - Lok Sabha Election 2024
- राजन विचारे यांनी भरला उमेदवारी अर्ज; मला तिसऱ्यांदा खासदार म्हणून जनता निवडून देईल - राजन विचारे - Lok Sabha Election 2024
- दक्षिण मध्य मुंबईत दोन मित्र भिडणार; राहुल शेवाळे आणि अनिल देसाई यांनी भरला उमेदवारी अर्ज - Lok Sabha Election 2024