मुंबई Shivsena UBT - दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत उभी फूट पडली. एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना सोबत घेऊन मोठं बंड केलं. यावेळी त्यांनी भाजपासोबत जात सरकार स्थापन केलं. यानंतर शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह हे कोणाचं? यावर अजूनही न्यायालयात प्रश्न प्रलंबित आहे. संख्याबळाच्या जोरावर शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे शिंदेंच्या शिवसेनेला देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगानं घेतला होता. यावर ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. याचा निकाल अजून बाकी असताना शिवसेना (ठाकरे गटासाठी) एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. मागील आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला निधी स्वीकारण्याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगानं परवानगी दिल्यानंतर आता शिवसेनेला (ठाकरे) देणगी स्वीकारण्याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगानं परवानगी दिली आहे.
देणगी स्वीकारता येणार : आता शिवसेना (ठाकरे) पक्षाला सार्वजनिक देणग्या स्वीकारण्याची परवानगी आहे, असं आज केंद्रीय निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. लोकप्रतिनिधी कायदा, 1951 च्या कलम 29 ब आणि कलम 29 क नुसार 'सरकारी कंपनी' व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्ती किंवा कंपनीनं किंवा खासगी कंपनीनं दिलेली देणगी आणि योगदान स्वइच्छेनं स्वीकारु शकतात. हे अधिकृत असेल, यासाठी आम्ही शिवसेना (ठाकरे गट) पक्षाला परवानगी दिलेली आहे, असं केंद्रीय निवडणूक आयोगानं म्हटलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षालाही परवानगी : मागील आठवड्यात 8 जुलै रोजी केंद्रीय निवडणूक आयोगानं विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार या पक्षाला देणगी गोळा करण्याची परवानगी दिली होती. यापक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं याबाबत आयोगाकडं निवेदन दिलं होतं. या निवेदनात आयोगाच्या नियम 29 बी अनुसार पक्षासाठी देणगी जमा करण्याचे अधिकार मिळावे, अशी मागणी करण्यात आली होती. या निवेदनानुसार निर्णय घेऊन आयोगानं विधानसभा निवडणुकीसाठी संस्था किंवा व्यक्तीकडून देणगी जमा करण्याची परवानगी राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाला प्रदान केली आहे.
हेही वाचा :