मुंबई : विधानसभा निवडणुकीतील दाखल केलेले अर्ज मागे घेण्याचा आजचा (सोमवार) शेवटचा दिवस होता. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी सिल्व्हर ओकवर राष्ट्रवादी काँग्रेस(शरदचंद्र पवार पक्ष)चे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतलीय.
अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस : या तीन नेत्यांमध्ये जवळपास एक तासभर बैठक झाली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे आणि दुपारनंतर सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. जे बंडखोर उमेदवारी अर्ज मागे घेणार नाहीत, त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई करण्यात येईल, असा इशारा यावेळी उद्धव ठाकरेंनी दिलाय. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यातील बैठकीनंतर या तीन नेत्यांनी संयुक्तरीत्या पत्रकार परिषद घेत माहिती दिली.
त्यांच्यावर पक्ष कारवाई करेल : पत्रकार परिषदेत सुरुवातीला संजय राऊत म्हणाले की, "आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रच निवडणूक लढवणार आहोत. आज अनेक बंडखोर उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेत. एकमेकांविरोधात निवडणूक न लढवण्याची आमची भूमिका आहे. महाविकास आघाडीत तिन्ही पक्षातील ज्यांनी बंडखोरी करत उमेदवार अर्ज दाखल केलेत, ते अर्ज मागे घेतील, असा विश्वास आहे. दरम्यान, दुपारपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल", तर आम्ही अलिबाग, पेण आणि पनवेल येथील उमेदवारी अर्ज मागे घेतोय. त्या जागा शेकाप पक्षाला जातील आणि आमच्या पक्षातील ज्या बंडखोरांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत, त्यांनी अर्ज मागे घ्यावेत. जर त्यांनी आज अर्ज मागे घेतले नाहीत, तर त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई करण्यात येईल. त्यांना पक्षाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा उद्धव ठाकरेंनी बंडखोरांना दिलाय.
मैत्रीपूर्ण लढाई नको : दुसरीकडं माकपच्या कराळे यांनी नाशिक पश्चिममधून उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. तर महाविकास आघाडीमध्ये मैत्रीपूर्ण लढाया या तिन्ही पक्षासाठी हितकारक नाहीत. मैत्रीपूर्ण लढाईच्या रस्त्याने जायची आमची तयारी नाही. मैत्रीपूर्ण लढाई ह्या तिन्ही पक्षाला न परवडण्यासारख्या आहेत. मैत्रीपूर्ण लढाई लढण्याचा आमचा विचार नाही आणि ते तिघांच्याही फायद्याचं नाही, असं शरद पवार यांनी म्हटलंय. दरम्यान, राज्याच्या डीजी रश्मी शुक्ला यांची बदली करण्याचा निर्णय झाला यावर बोलताना पवार म्हणाले की, रश्मी शुक्ला यांच्या बदलीचा योग्य निर्णय आहे.
हेही वाचा -