रत्नागिरी Lok Sabha Election 2024 : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराचा तिढा अद्याप कायम आहे. शिवसेना-भाजपा दोन्हीकडून दावा केला जात आहे. अशातच बैठकांचे सत्र देखील दोन्ही पक्षांकडून सुरू आहे. आज रत्नागिरी येथे शिवसेनेची महत्वपूर्ण बैठक हाँटेल विवेकमध्ये संपन्न झाली. रत्नागिरीतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची ही बैठक होती. या बैठकीला मंत्री उदय सामंत (Uday Samant) उपस्थित होते. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघाबाबत यावेळी भूमिका बैठकीत मंडण्यात आली.
किरण सामंत यांना कार्यकर्त्यांनी उचलून नेलं व्यासपीठावर : किरण सामंत यांचं बैठकीच्या ठिकाणी आगमन झालं, त्यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांना उचलून घेत व्यासपीठावर नेलं. तसंच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शिंदे शिवसेनेकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करत किरण सामंत यांच्या उमेदवारीची मागणी कार्यकर्त्यांनी लावून धरली. भाजपाच्या बुथ कार्यकर्ता मेळाव्यानंतर शिवसेना शिंदे गटाची ही पहिलीच बैठक होती.
भाजपला तिकीट मागण्याचा अधिकार तसा आम्हाला देखील अधिकार : यावेळी उदय सामंत म्हणाले की, हे शक्ती प्रदर्शन नाही. या पदाधिकाऱ्यांच्या भावना आहेत. कार्यकर्त्यांच्या भावना नेत्यांपर्यंत पोहोचवणं हे शक्तिप्रदर्शन नाही. राणे यांची काल भेट घेतली तेव्हा महायुतीचा उमेदवार निवडून आला पाहिजे असं राणे यांनी सांगितलं. भाजपाला उमेदवार मागण्याचा अधिकार तसा आम्हाला देखील आहे. तिकीट वाटपामध्ये कार्यकर्त्यांना भरडलं जात आहे. हे कळल्यानंतर त्या भावनेतून किरण सामंत यांचं ते ट्विट होतं. संयमी याचा अर्थ मी हतबल आहे असा नाही. तुमच्या भावना मी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना सांगितल्या. धनुष्यबाणवरचा उमेदवार लोकसभेत जावा हि सर्वांची भावना आहे. माझा मोठा भाऊ लोकसभेत गेला पाहिजे ही माझी भावना आहे. काही फुटकळ लोक टीका टिपणी करत असतील तर त्याकडं दुर्लक्ष केलं पाहिजं. खासदारकी दोन ते अडीच लाख मतानं जिंकली पाहिजे हे उद्दिष्ट आहे.
स्वतःच्या मतदारसंघातून निवडून येऊन दाखवा : आमदार वैभव नाईक यांच्याबाबत बोलताना मंत्री सामंत म्हणाले की, आधी मालवणमधून निवडून या, किती वेळा एकनाथ शिंदे यांच्या केबिनमध्ये असता मला माहिती आहे. एकनाथ शिंदे यांचं तिकडं जाऊन पाय धरायचं आणि इकडं येऊन दादागिरी करायची, पहिल्यांदा स्वतःच्या मतदारसंघातून निवडून येऊन दाखवा असं प्रत्युत्तर सामंत यांनी यावेळी दिलं.
महायुतीचाच मुख्यमंत्री पुन्हा व्हावा : मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, राणे यांना विश्वासात घेऊन ही जागा मागूया. तसेच 2024 मध्ये महायुतीचाच मुख्यमंत्री पुन्हा व्हावा यासाठी सर्वांनी ताकतीनं प्रयत्न करूया असं किरण सामंत यावेळी म्हणाले. दरम्यान, वैभव नाईक यांच्या विधानाबाबत किरण सामंत म्हणाले की, काल जे कोणी बोलले आहेत त्या ठिकाणी निलेश राणे यांचा विजय हा कमीत कमी 50 हजार मतांनी होईल. पूर्ण ताकद आम्ही त्या ठिकाणी लावू असा इशारा यावेळी किरण सामंत यांनी दिला.
हेही वाचा -
- पराभवाची जाणीव झाल्यानं माझ्या विरोधात कारस्थान रचलं; रश्मी बर्वे यांचा आरोप - Rashmi Barve VS Mahayuti
- भाजपाच्या वाढता दबावापुढं मुख्यमंत्री हतबल; विद्यमान ४ खासदारांची तिकिटं कापल्यानं तणाव वाढला - Lok Sabha Election 2024
- भिवंडी लोकसभेसाठी राष्ट्रवादीचे सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर, कपील पाटील यांना देणार काटे की टक्कर - Lok Sabha Election 2024