मुंबई- गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने नवीन काही कायदे तयार केलेत. ज्याच्यामध्ये पुरावे कसे गोळा करावेत यासंदर्भात काही नियम ठरवलेले आहेत. पुरावे योग्य पद्धतीनं कसे सुरक्षित ठेवावेत, यासाठी महाराष्ट्र सरकारने मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन तयार केलीय. देशात महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे की, ज्याने मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन आणलीय. महाराष्ट्रात 21 व्हॅन या आजपासून कार्यरत होणार आहेत. तर महाराष्ट्र राज्यात आगामी काळात राज्यातील विविध भागात 256 मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन आणणार आहोत. विशेष म्हणजे या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमध्ये विविध प्रकारचे साहित्य अन् फॉरेन्सिक तज्ज्ञ असतील, त्यामुळे यामधून फॉरेन्सिक रिपोर्टसुद्धा येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलीय. आज सह्याद्री अतिथीगृह येथे मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालंय, त्यावेळी ते बोलत होते.
पुरावा जागेवरच मिळणार : गुन्हेगारीची घटना घडल्यानंतर अनेक वेळा आरोपी हा गुन्हा करून मोकाट सुटतो. त्यामुळे गुन्हे वाढतात आणि गुन्हेगारांना पकडण्यास पोलिसांना विलंब होतो. मात्र आता गुन्हा घडल्यानंतर त्या जागेवरतीच पुरावा मिळणार आहे. ब्लड टेस्टिंग, नार्को टेस्ट किंवा अन्य सॅम्पल या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनच्या माध्यमातून जागेवरतीच घेतले जाणार आहेत. तसेच या सॅम्पलच्या टेस्टिंगमधून जागेवरतीच पुरावा मिळण्यास मदत होणार आहे. अनेक वेळा गुन्हेगार गुन्हे करून पळून जातात. परंतु आता तसे होणार नाही. पुरावा हा मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनच्या माध्यमातून लगेच मिळेल आणि गुन्हा कोणी केलाय हे पण समजायला मदत होईल, असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय.
मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनच्या माध्यमातून अहवाल समोर : पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या फॉरेन्सिक व्हॅनमध्ये विविध प्रकारचे इक्विपमेंट साहित्य आहे. तसेच फ्रीज आहे, सीसीटीव्ही कॅमेरा आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून याच्यावर लक्ष असणार आहे. तसेच गुन्हेगारीची घटना घडल्यानंतर पहिली माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस याची माहिती फॉरेन्सिक कंट्रोल रूमला देतील. त्यानंतर कंट्रोल रूम मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमधील कर्मचाऱ्यांना माहिती देतील आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन तेथील जे संपल्स आहेत, ते सॅम्पल घेऊन मोबाईल फॉरेन्सिक यांच्या माध्यमातून अहवाल समोर येईल. तसेच पुरावाही समोर येईल. त्यामुळे ही प्रणाली गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी आणि गुन्हेगारांच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी फायदेशीर ठरेल, असंही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय.
हेही वाचा-