चंद्रपूर Lok Sabha Election 2024 : धानोरकर कुटुंबाकडं दारूचे 17 दुकाने आहेत. त्यांना 17 चे 70 दारूची दुकाने करायची आहेत. बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांचा व्हिडिओ देखील उपलब्ध आहे. त्यामुळं ते आरोप करतीलच, पण मी देशासाठी लढतोय 'देशी'साठी नाही. अशी जोरदार टीका भाजपाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्यावर केलीय.
जिल्ह्याच्या दारुबंदीवर काय म्हणाले मुनगंटीवार : "धानोरकर कुटुंबाने केवळ आपला विकास केला आहे. त्यांनी नेमका कुठला विकास केला हे सांगण्यासाठी त्यांच्याकडं काहीच नाही. मुळात धानोरकर कुटुंबाकडं 17 दुकाने होती, त्यांना ती 70 करायची आहेत. हाच त्यांच्या दृष्टीने विकास असावा मात्र, 'मी देशासाठी काम करणारा नेता आहे, 'देशी'साठी नाही'" असा टोलाही त्यांनी लगावला.
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा प्रचार करण्याची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघापासून करणार आहेत. माझ्या प्रचारार्थ त्यांची सोमवारी चंद्रपुरात सभा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्या प्रचारासाठी येत आहेत हे माझे सौभाग्य समजतो. ते मला आशीर्वाद देण्यासाठी आणि चंद्रपूरच्या मतदारांशी संवाद साधण्यासाठी येत आहेत. - सुधीर मुनगंटीवार, उमेदवार, भाजपा
संजय राऊत यांना गंभीरपणे घेत नाही : "नरेंद्र मोदी यांनी मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या प्रचारार्थ चंद्रपुरात एक काय पाच सभा जरी घेतल्या तरीही, महाविकास आघाडीच्या प्रतिभा धानोरकर ह्याच निवडून येणार," अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे संजय राऊत यांनी दिली होती. याबाबत मुनगंटीवारांनी "संजय राऊत यांना मी फार गांभीर्याने घेत नाही. डॉक्टरपेक्षा कंपाउंडर बरा, पाप, केल्यानं कोरोना होतो, असं बेताल वक्तव्य त्यांनीच केलं होतं. त्यामुळं त्यांना फारसं गंभीरपणे घेण्याची आवश्यकता नाही," असेही मुनगंटीवार म्हणाले.
हंसराज अहिरांबाबत काय बोलले मुनगंटीवार : हंसराज अहीर यांच्या जागी सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचा अंतर्गत वाद हा सर्वश्रुत आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात ते फारसे दिसून येत नाहीत. राजुरा येथील नितीन गडकरी यांच्या सभेत देखील ते अनुपस्थित होते. याबाबत विचारणा केली असता त्यांनी याला नकार दिला. "असं काहीही नाही, ते गडकरी यांच्या सभेच्या वेळी दिल्लीत होते. भारतीय जनता पक्षाचा नेता हा प्रचाराशिवाय राहूच शकत नाही. अहीर देखील प्रचार करत आहेत," असे मुनगंटीवार म्हणाले.
जोरगेवार समर्थन जाहीर करणार : प्रचाराच्या मुद्द्यावरुन महायुती सरकारला समर्थन देणारे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्यातली असलेली धुसफूस काही दिवसांपूर्वी समोर आली होती. जोरगेवार यांचे कार्यकर्ता बलराम डोडाणी यांनी मुनगंटीवार यांच्या विरोधात सोशल मीडियावर मोहीम सुरू केली होती. यावर मुनगंटीवार यांनी जोरगेवार यांना निर्वाणीचा इशारा दिला होता. त्यांचे कार्यकर्ता टीका करत असताना "मी जोरगेवार यांना मदत मागण्याचा प्रश्नच येत नाही. जर त्यांनी मदत केली नाही, तर पुढच्या निवडणुकीत मी सुद्धा त्यांना मदत करणार नाही," असा इशारा त्यांनी दिला होता. जोरगेवार यांच्यासोबत काही समेट घडला का, या प्रश्नावर मुनगंटीवार म्हणाले, "याबाबत जोरगेवार लवकरच मला समर्थन देत असल्याचं पत्र काढणार आहेत. सोबत डोडाणी यांना देखील ते यंग ब्रिगेड या संघटनेतून काढणार आहेत आणि लवकरच ते महायुतीचा प्रचार करणार आहेत."
हेहा वाचा -