मुंबई Narhari Zirwal Protest: धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण मिळावे, यासाठी आदिवासी समाजाकडून जोरदार आंदोलन करण्यात येत आहे. तरीही राज्य सरकारने धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे (ST) आरक्षण देण्याचा जीआर काढल्यास 65 आमदार आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देतील, असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते नरहरी झिरवाळ यांनी दिलाय. या संदर्भात झिरवाळ आणि अन्य आदिवासी आमदारांनी शुक्रवारी मंत्रालयात आंदोलनही केले.
अभ्यास न करता धनगर समाजाला आरक्षण: धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण मिळावे, यासाठी आदिवासी समाजाच्या वतीने मंत्रालयात जोरदार आंदोलन करण्यात येत आहे. धनगर समाजाच्या मागण्यांचा विचार करून राज्य सरकार धनगर समाजाचा एसटीमध्ये समावेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, राज्य सरकार कोणत्याही प्रकारचा अभ्यास न करता धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याचा निर्णय घेत असेल तर त्याला आमचा ठाम विरोध आहे. त्यानंतरही सरकारने धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी जीआर काढण्याचा प्रयत्न केला, तर आमचे आदिवासी समाजाचे 65 आमदार विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देतील, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते नरहरी झिरवाळ यांनी दिलाय. यासंदर्भात झिरवाळ आणि अन्य आमदारांनी शुक्रवारी मंत्रालयात जोरदार आंदोलन केलं. मंत्रालयातील जाळ्यांवर झिरवळांसह काही आमदारांनी उड्या घेतल्यात.
आदिवासी समाजाचा बळी देऊ नका - झिरवाळ : सध्या राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापले आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केले आहे. तसेच ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनदेखील सुरू झाले आहे. त्यात आता धनगर आणि धनगड समाज यातही वाद सुरू झाला आहे. या संदर्भात बोलताना नरहरी झिरवाळ म्हणाले, आदिवासी समाजाच्या संरक्षणासाठी आम्ही सर्व जण एकवटणार आहोत आणि बैठक घेऊन याचा विरोध करणार आहोत. धनगर आणि धनगड हे दोन्ही वेगळे आहेत, असा निर्णय कोर्टाने दिला आहे. यासंदर्भात न्यायालयीन लढाई सुरू आहे. मात्र कुणाला तरी फायदा व्हावा म्हणून आमचा बळी देणार असाल तर आम्ही ते खपवून घेणार नाही, आम्ही बैठक घेऊन पुढील रणनीती कशी असणार हे ठरवणार आहोत, यापेक्षाही उग्र आंदोलन करण्याचा आमचा विचार असल्याचेही झिरवाळ यांनी सांगितले.
हेही वाचाः
मंत्रालयात आदिवासी आमदारांचं आंदोलन: नरहरी झिरवाळांनी मारली जाळीवर उडी - Narhari Zirwal Protest