मुंबई Sanjay Raut On Pm Modi : महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत शिवसेना (ठाकरे गट) नेते खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपा तसंच महायुतीवर निशाणा साधलाय. "महाराष्ट्राचे लचके तोडण्यासाठी भाजपाकडून कशा पद्धतीचे प्रयत्न होत आहेत. एकनाथ शिंदे, अजित पवार हे त्यात सामील आहेत," असा आरोप संजय राऊत यांनी केलाय. ते आज मुंबईत बोलत होते.
मोदी-शाहांच्या औरंगजेबाप्रमाणे महाराष्ट्रात स्वाऱ्या : याप्रसंगी बोलताना संजय राऊत म्हणाले की, "आज महाराष्ट्र दिन, महाराष्ट्राच्या निर्मितीची घोषणा आज झाली. मुंबईसह महाराष्ट्र मिळावा म्हणून महाराष्ट्राला खूप मोठा संघर्ष करावा लागला. 106 हुतात्म्यांना बलिदान द्यावं लागलं. आजच्या दिवशी गुजरात राज्याची देखील निर्मिती झाली. त्यामुळं मी गुजरातच्या बांधवांना देखील शुभेच्छा देतो. परंतु, महाराष्ट्र निर्माण झाल्यापासून सतत त्याच्यावर अनेकांची वक्रदृष्टी कायम राहिलेली आहे, ती आज सुद्धा आहे. त्याकरीता महाराष्ट्रातच अखंडत्व आणि वैभव टिकवण्यासाठी ही लढाई पुन्हा नव्यानं सुरु झालीय. दिल्लीवरुन मोदी आणि शाह यांच्या स्वाऱ्या औरंगजेबाप्रमाणे महाराष्ट्रात होत आहेत. त्यांच्यापासून महाराष्ट्राचं रक्षण करण्याची जबाबदारी ती पुन्हा एकदा आपल्या सर्वांवर पडलेली आहे."
महायुतीवर टीका : काही भटकते आणि वखवखलेले आत्मे महाराष्ट्राचे लचके तोडण्यासाठी तसंच महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठी महाराष्ट्राच्या आभाळात फडफडत आहेत. महाराष्ट्राच्या हक्काचे, अधिकाराचे लचके तोडत आहेत. महाराष्ट्र लुटला जात आहे. महाराष्ट्राच्या जनतेला कमजोर केलं जात आहे. शिवसेना जोपर्यंत इकडं ठामपणे उभी आहे. तोपर्यंत यांना ते शक्य नाही. याकरता या सर्वांनी एकत्र येत शिवसेना तोडली सोबत शरद पवार यांचा पक्ष तोडून त्यांनासुद्धा कमजोर करण्याचा प्रयत्न केला आहे. पण या प्रसंगी काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी ठामपणे उभे राहून लढत राहतील, या शब्दात त्यांनी महायुतीवर टीका केलीय.
महाराष्ट्राच्या चाव्या दिल्लीच्या चरणी : पुढं बोलताना संजय राऊत म्हणाले, "आताच्या महाराष्ट्राची अशी अवस्था कधीच नव्हती. या अगोदर महाराष्ट्र हा कधीच दिल्ली पुढं झुकला नाही, हा इतिहास आहे. हा इतिहास छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून चिंतामणराव देशमुख असतील, बाळासाहेब ठाकरे असतील, यशवंतराव चव्हाण, शरद पवार आणि आता उद्धव ठाकरे असतील, महाराष्ट्र झुकला नाही. महाराष्ट्र लढत राहिला आपल्या स्वाभिमानासाठी. आताच्या राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या चाव्या दिल्लीच्या चरणी ठेवल्या आहेत. त्याला थैलीचं राजकारण म्हणतात. मुंबईचा लुटीचा माल दिल्लीच्या चरणी वाहायचा आणि महाराष्ट्रात सत्ता उपभोगायची हे सध्याच्या राजकर्त्यांचे धोरण आहे. भाजपाला महाराष्ट्राचं कधीच घेणं देणं नव्हतं. महाराष्ट्राच्या कुठल्याही स्वाभिमानाच्या लढ्यात भारतीय जनता पक्षानं कधी पुढाकार घेतला असेल, तर ते त्यांनी दाखवावे. ते ना कधी स्वातंत्र्याच्या लढ्यात होते, ना कधी देशाच्या, महाराष्ट्राच्या लढ्यात होते. त्यामुळं त्यांना महाराष्ट्र विषयी स्वाभिमान, प्रेम असण्याचं काहीचं कारण नाही."
एकनाथ शिंदेंनी लोटांगण घातलं : एकनाथ शिंदेंना लोकसभेसाठी भेटलेल्या जागांविषयी बोलताना राऊत म्हणाले की, "मला शिंदे गटाविषयी चर्चा करायची नाही. तो शिवसेना फडणवीस गट आहे. शिंदे गट महाराष्ट्रातल्या किती जागा लढत आहेत. ते माझ्याकडे नक्की आकडा नाही. शिवसेना जी आहे बाळासाहेब ठाकरे यांनी जी स्थापन केलेली ती शिवसेना सातत्यानं महाराष्ट्रात 21, 22 जागा लढत आलेली आहे. तो आमचा आकडा कायम आहे. ते आपण पाहिलं असेल तीन पक्षांच्या जागा वाटपात सुद्धा अत्यंत सन्मानानं जागा वाटप झालं, त्यात आम्ही 21 जागा लढत आहोत. 22 वी जागा होती जी उत्तर मुंबईची ती आम्ही शेवटच्या क्षणी काँग्रेसला लढण्यासाठी दिली. आता हा जो शिवसेना फडणवीस गट आहे. हे 12, 13 जागा लढत आहेत. म्हणजे त्यांनी स्वतःच्या जागा कमी करुन घेतल्या, याला लोटांगण घालणं बोलतात.
अजित पवारांनी पुन्हा दैवत बदलेलं असेल : अजित पवार यांनी दैवत बदललंय आणि 2024 ला सरकार बदलेल. मोदी नसतील आणि परत त्यांना ईडीची नोटीस येईल, तेव्हा त्यांनी परत दैवत बदललं असेल, असा सणसणीत टोलाही संजय राऊत यांनी लगावलाय.
हेही वाचा :