मुंबई : विधानसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर सत्ताधार आणि विरोधक यांच्यातील कलगीतुरा अधिकच वाढत असल्याचं बघायला मिळतंय. अशातच आता निवडणुकीचा प्रचार करत असताना शिवसेनेचे (उबाठा) खासदार अरविंद सावंत यांनी महायुतीच्या उमेदवार शायना एनसी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं. "त्या आयुष्यभर भाजपात राहिल्या आणि आता शिवसेनेत आल्या. पण इथं इम्पोर्टेड माल चालत नाही. आमच्या इथं ओरिजनल माल चालतो,” असं ते म्हणाले. अरविंद सावंत यांच्या या वक्तव्यानंतर शायना एनसी चांगल्याच संतापल्या आहेत. याप्रकरणी त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर अरविंद सावंत यांच्यावर गुन्हा दाखल झाला.
तत्काळ कारवाई व्हावी : अरविंद सावंत यांच्या वक्तव्यावर आता राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. "अरविंद सावंत यांनी ज्या पद्धतीनं मुंबादेवीच्या उमेदवार शायना एन सी यांचा 'माल' असा उल्लेख करत अपमान केलाय. तो अत्यंत निषेधार्थ आहे. मी त्याचा निषेध करतो. उद्धव ठाकरे यांनी अरविंद सावंत यांच्यावर तत्काळ कारवाई केली पाहिजे. कारण, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महिलांचा आदर करण्याचं शिकवलंय. त्याच्या विपरीत अरविंद सावंत यांनी केलंय. त्यामुळं त्यांनी शायना एनसी यांची माफी मागावी", अशी प्रतिक्रिया भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी दिलीय.
अरविंद सावंत काय म्हणाले? : या संदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना अरविंद सावंत म्हणाले की, "मी गेली पन्नास वर्षे राजकीय आणि सामाजिक जीवनात काम करत आहे. इतक्या वर्षांमध्ये मी कुठल्याही महिलेबद्दल अवमानकारक वक्तव्य केलेलं नाही आणि करणारही नाही. मी नेहमी महिलांचा आदरच केलाय. पण मुळात प्रश्न हा आहे की मी दोन दिवसांपूर्वी हे वक्तव्य केलं होतं. तेव्हा केवळ त्यांनाच नाही तर आमचा उमेदवार होता, त्यांनाही मी ओरिजनल माल असं संबोधलं होतं. मग आता दोन दिवसानंतर यांना कशी जाग आली? या शब्दाचा इंग्रजीत अर्थ 'गुड्स' असा होतो आणि मराठीत तुम्ही जसा घ्याल तसा होतो. पण दोन दिवसानंतर अर्थाचा अनर्थ करून त्या एक वेगळा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करताय."
"शायना एनसी माझी जुनी चांगली मैत्रीण आहे, ती काय माझी शत्रू नाही. तसंच भाजपाला महिलांचा इतका आदर असेल तर मणिपूरमध्ये जेव्हा महिलांना विवस्त्र केलं जातं. त्यावेळेस देशाच्या पंतप्रधानांनी ब्र शब्द काढला नाही. दुसरीकडं ज्या संजय राठोड यांच्या विरोधात भाजपाच्या चित्रा वाघ यांनी गंभीर आरोप केलेत. त्यांच्यावर आधी कारवाई करा मग माझ्या कारवाईचं बोला", असंही सावंत म्हणाले.
हेही वाचा -