शिरूर (पुणे) Shivajirao Adhalrao Patil : शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोठी जबाबदारी सोपवली आहे. म्हाडाच्या अध्यक्षपदी शिवाजीराव आढळराव पाटील यांची निवड करण्यात आली आहे. आढळराव पाटील यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा असणार आहे. राज्य शासनाचे सहसचिव अजित कवडे यांनी त्याबाबत जीआर काढलाय. आढळराव पाटील यांच्या निवडीचं सर्व स्तरातून स्वागत होत आहे. ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर आढळराव यांना हे महामंडळ देण्याचं नेमकं कारण काय? असा प्रश्न निर्माण झालाय. लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातील महायुतीच्या उमेदवारांमध्ये यामुळं काही बदल होणार का? अशा चर्चांना देखील उधाण आलं आहे.
लोकसभा निवडणूक लढणारच : शिरूरचे माजी खासदार असलेले शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितलं की, आगामी लोकसभा निवडणूक शिरूर मतदार संघातून लढवणार आहे. त्यासाठी मतदारसंघात कामं देखील सुरू केली आहेत. लोकसभा निवडणुकीचा बिगुल येत्या काही महिन्यात वाजण्याची शक्यता आहे. आढळराव पाटलांना सध्या बदललेल्या राजकीय स्थितीचा फायदा होण्याचा विश्वास आहे. त्यामुळं येणारी लोकसभा निवडणूक शिरूर मतदार संघातून लढवणार असल्याचं शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ठामपणे स्पष्ट केलं आहे.
दोन गटात रस्सीखेच : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिरूर मतदारसंघातून एकनाथ शिंदे गट, अजित पवार गट आणि शरद पवार गटात रस्सीखेच सुरू आहे. महायुतीतमध्ये अजित पवार गटाचे उमेदवार असणार की, शिंदे गटाचे दावेदार आढळराव पाटील उमेदवार असणार, यावर अजून शिक्कामोर्तब झालेलं नाही. त्यातच भाजपादेखील आपला उमेदवार रिंगणात उतरवणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
म्हाडाच्या माध्यमातून होणार कामे : शिवाजीराव आढळराव पाटील यांना म्हाडाचे अध्यक्षपद मिळाल्यानं कामे अधिक वेगाने होणार, अशी प्रतिक्रिया त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे. दरम्यान प्रादेशिक मंडळाचं कामकाजाबाबत धोरण आखणं, आढावा घेणं, नियंत्रण करणं, प्रधानमंत्री आवास योजना अशी कामे म्हाडाच्या माध्यमातून करता येणार आहेत. या नियुक्तीनंतर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले की, गोरगरिबांना स्वस्तात घरे मिळवून देणं, जास्तीत जास्त लोकांना म्हाडाचा लाभ मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच राज्य सरकारने जो विश्वास दाखवला त्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.
हेही वाचा -
- Amol Kolhe criticism Shivajirao Patil: तुम्ही तर अडचणीत उद्धव ठाकरे यांना सोडलं...मी तर पवार साहेबांच्या सोबतच - अमोल कोल्हे
- Pune District Chief Joins Shinde Group : कोर्टाच्या निकालानंतर ठाकरे गटाला मोठा धक्का, पुणे जिल्हा प्रमुखाचा शिंदे गटात प्रवेश
- Grampanchayat Election 2022 : पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचेच पारडे जड; सहा ग्रामपंचायती बिनविरोध