छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Sharad Pawar On Amit Shah : "काही दिवसांपूर्वी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी माझ्यावर ‘भ्रष्टाचाराचा सुभेदार’ असं म्हणत टीका केली. पण ज्यांनी ही टीका केली, त्या देशाच्या गृहमंत्र्यांना कायद्याचं उल्लंघन केलं म्हणून तडीपार करण्यात आलं होतं. गुजरात दंगल प्रकरणी कोर्टानं तडीपार केलं, तो व्यक्ती आज देशाच्या संरक्षणाची जबाबदारी सांभाळतोय," अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी जाहीर कार्यक्रमात केली. तसंच "राजेश टोपे म्हणाले, माझं बोट धरुन ते राजकारणात आले. मात्र, त्यावर माझा विश्वास नाही. कारण नरेंद्र मोदी देखील असं म्हणाले होते. पण मला माझ्या बोटावर विश्वास आहे," असा खोचक टोलाही शरद पवार यांनी लगावला.
जुन्या आठवणींना दिला उजाळा : शरद पवार यांच्यावर आधारित 'शरद पवार, द ग्रेट इंजिमा' या पुस्तकाचा उर्दू भाषेत अनुवाद करण्यात आला. त्याचं प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत, केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवर शरद पवार यांनी टीका केली. तसंच या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात शरद पवार यांनी आयुष्यातील प्रमुख घटनांचा उल्लेख केला. ते म्हणाले, "डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरादरम्यान आमच्या समोर मोठं आव्हान होतं. त्यावेळी असलेल्या पोलीस आयुक्तांनी खूप संदेश पाठवले. अनेकांची घरं जळत आहेत, निर्णय लोकांना मान्य नाही, यात बदलणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले. मात्र, डॉ. बाबासाहेबांनी संविधान लिहिलं, त्यांच्या नावानं असलेलं विद्यापीठ का नको? त्याला विरोध का? त्यावेळी सक्तीचा निर्णय घेणं गरजेचं होत", असं शरद पवार म्हणाले.
पुढं ते म्हणाले, "1993 मध्ये गणेश विसर्जनाच्या रात्री 4 पर्यंत आम्ही जागलो. मला अधिकाऱ्यांनी माहिती दिली, की आता लोक जबाबदारीनं वागतायत. मात्र, 4 वाजता मला लातूरमध्ये भूकंप झाल्याची माहिती मिळाली. मी रात्री अधिकाऱ्यांना घेऊन हेलिकॉप्टरमधून तिथं पोहोचलो. घरं पडली, लोकांना लागलं होतं. मी 15 दिवस तिथं थांबलो. एका वर्षात 2 लाख घर बांधली. समस्या सोडवण्याची तयारी असली, तर प्रश्न सुटतात हे मी लातूर भूकंपात शिकलो", असं शरद पवारांनी सांगितलं.
मराठा आंदोलकांनी घेतली भेट : शुक्रवारी शरद पवारांची मराठा आरक्षणाबाबत भूमिका जाणून घेण्यासाठी आंदोलकांनी भेटीचा आग्रह धरला. तसंच भेट झाली नाही, तर आम्ही रत्यावर येऊन आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला. मात्र, शरद पवार यांनी भेटीला वेळ दिली. जवळपास पाऊण तास त्यांनी चर्चा केली. सरकार मनोज जरांगे आणि आंदोलकांशी काय चर्चा करते, याबाबत विरोधकांना माहिती देत नाही. त्यामुळं नेमकं काय सुरू आहे, हे कळत नाही. सरकारनं सर्व पक्षातील लोकांना आमने-सामने बसून चर्चा करायला हवी. सरकारनं जर ओबीसींमधून आरक्षण देण्याचा निर्णय घेतला, तर आम्ही सोबत राहू, असं शरद पवार म्हणाले, असं आंदोलकांनी बैठकीनंतर सांगितलं.
हेही वाचा -