मुंबई - महाराष्ट्रात उद्या पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार आहे. या मतदानाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमधून काही गौप्यस्फोट केले आहेत. या मुलाखतीत शरद पवार यांनी 2019 च्या सत्ता संघर्षाचा उल्लेख केला. 2019 मध्ये महाविकास आघाडीचा जन्म झाला. यात मुख्यमंत्रीपदी कोण बसणार यावरून आघाडीत अनेक बैठका झाल्या. मात्र, यात 'आमच्यासमोर एकनाथ शिंदे यांचे नाव आलं नाही' असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. 'एकनाथ शिंदे यांच्या नावाबाबत शिवसेनेचे अंतर्गत चर्चा झाल्याचं नंतर आम्हाला कळलं' असं देखील शरद पवार यांनी म्हटलं आहे. याला आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिल आहे.
नेता इथल्या प्रत्येक घटकाला मान्य असावा- संजय राऊत यांना शरद पवारांच्या वक्तव्याबाबत माध्यमांनी विचारले असता राऊत म्हणाले की, "शरद पवारांनी केलेलं वक्तव्य याला गौप्यस्फोट वगैरे तसं म्हणू शकत नाही. शरद पवारांनी जे प्रफुल्ल पटेल यांच्याबद्दल सांगितलं हा गौप्यस्फोट नसून उघड सत्य आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याबाबत शरद पवार, राहुल गांधी यांच्याविषयी मी इतकच सांगेल की या दोघांचही एकमत होतं. त्यांच एकमत असं होतं की, या सरकारच नेतृत्व करणारा नेता असा असावा. हा नेता इथल्या प्रत्येक घटकाला मान्य असावा. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदी नको. आम्ही त्यांच्या हाताखाली काम करणार नाही. हे सांगायला सर्वात आधी सुनील तटकरे, अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील आले होते. त्यांचं म्हणणं होतं आम्ही सिनियर आहोत. आम्ही जूनियर माणसाच्या हाताखाली काम करणार नाही."
शिवसेनेकडून त्यांचं नाव पुढे गेलं होतं- पुढे बोलताना राऊत म्हणाले की, "2019 ला सुद्धा शिवसेना आणि भाजपामध्ये मुख्यमंत्रीपदावरून वाद झाला होता. तेव्हा विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड आम्ही केली होती. शिवसेनेकडून त्यांचं नाव पुढे गेलं होतं. परंतु भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्लीचा निर्णय काय येईल, हे आम्हाला माहिती नाही असा आम्हाला निरोप पाठवलेला होता. परंतु आम्हाला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून चालणार नाहीत. ही भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांची तेव्हा भूमिका होती."
शिंदे यांच्या कामाची पद्धत "पैसा फेको तमाशा देखो"संजय राऊत यांनी मुख्यमंत्री पदाच्या निवडीवरून मोठं वक्तव्य केलं. ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते म्हणाले, "शिंदे यांचा अनुभव नव्हता. शिंदे यांच्या कामाची पद्धत "पैसा फेको तमाशा देखो" अशी असल्यामुळे अनेकांना ते आपल्या आसपास नको होते. फक्त पैशाचा व्यवहार आणि व्यापार करणं हे नेतृत्व नाही. ही भारतीय जनता पक्षाची भूमिका होती. ही सगळी महाविकास आघाडी स्थापन होण्याच्या आधीची गोष्ट आहे. भाजपा आणि राष्ट्रवादीच्या काही नेत्यांचं म्हणणं होत की, "शिंदे चालणार नाहीत. पण, आम्ही बोलत होतो की, विधिमंडळ पक्ष नेते म्हणून त्यांची निवड केली होती. म्हणून कदाचित त्यांची निवड होऊ शकते. भाजपाच्या सर्वच वरिष्ठ नेत्यांचं असं म्हणणं होतं की, आम्हाला एक वरिष्ठ नेता द्या. शिंदे नको." असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या वक्तव्याला एक प्रकारे दुजोरा दिला आहे.
हेही वाचा-