नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर एनडीएकडून सत्तास्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अशा स्थितीत इंडिया आघाडीनं 'थांबा आणि वाट पाहा' चे धोरण स्वीकारलेले दिसत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एनडीएचे सरकार फार काळ टिकणार नाही. नरेंद्र मोदी यांना शपथ घेऊ द्या, त्यांच्यासाठी आम्ही मिठाई वाटू, अशा शब्दात त्यांनी एनडीची खिल्ली उडविली. इंडिया आघाडीजवळ जनादेश आणि संख्याबळ असल्याचा खासदार संजय राऊत यांनी यावेळी दावा केला.
सरकार चालविणं मोदी सरकारला जमणार नाही- शिवसेना ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत म्हणाले, "भाजपा ही २३७-२४० वर अडखळली आहे. माझं मत आहे की, मोदी आणि भाजपाजवळ बहुमत नाही. त्यांना अस्थिर सरकार देण्याची इच्छा आहे. भाजपाकडं बहुमत कोठे आहे? मित्रपक्षांना घेऊन सरकार चालविणं भाजपाला जमणार नाही. ते नेहमीच 'मोदी सरकार' आणि 'मोदी गॅरंटी'चं बोलत होते. जर ते सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करत असतील तर ते सरकार टिकणार नाही. भाजपाजवळ स्पष्ट जनादेश नाही. त्यामुळे त्यांनी टीडीपी आणि जेडीयूवर अवलंबून राहावं लागणार आहे." यावेळी संजय राऊत यांनी टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू, चिराग पासवान आणि जेडीयूचे प्रमुख नितीश कुमार यांच्याशी चर्चा करण्याचे संकेत दिले.
आम्ही मनोरंजन का सोडू? - पुढे राऊत म्हणाले, " एनडीएमध्ये कोण आहे, नीतीश बाबू, चंद्रा बाबू, दो बाबू है. चिराग बाबू है..पाहू..जनतेनं भाजपाचं बहुमत हिसकावून घेतलं आहे. त्यांना २३२ वर आणून उभं केलं आहे. तोडमोड करून ते सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना ( भाजपा) तसे प्रयत्न करू द्या. लोकशाहीत असे प्रयत्न होतात. त्यांच्याजवळ संख्याबळ असेल तर पंतप्रधान मोदींना शपथ घेऊ द्या. आम्ही पाहत राहणार आहोत. आमचे मनोरंजन होत आहे. आम्ही मनोरंजन का सोडू? अशी राऊत यांनी एनडीएच्या सत्तास्थापनेच्या प्रयत्नाची खिल्ली उडविली.
भाजपाची सत्ता स्थापन करण्याकरिता मित्र पक्षावर मदार- प्रत्यक्षात चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी एनडीएच्या बैठकीला हजर राहून भाजपाला समर्थन दिलं आहे. तरीही इंडिया आघाडीकडून एनडीएला धक्का देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार भाजपाला २४० जागांवर विजय मिळाला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ३०३ जागांवर विजय मिळाला होता. भाजपाला एनडीए आणि जेडीयून समर्थन दिल्यानंतर २७२ हा बहुमताचा आकडा गाठणं शक्य होणार आहे. दुसरीकडं काँग्रेसनं ९९ जागांवर विजय मिळविला आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेससह इंडिया आघाडीकडं बहुमत नाही.
हेही वाचा-